Advertisement

दादरमधील 'त्या' रोडवरील सर्व झाडांची छाटणी, फक्त खोडच ठेवणार!


दादरमधील 'त्या' रोडवरील सर्व झाडांची छाटणी, फक्त खोडच ठेवणार!
SHARES

दादर पश्चिम येथील मारुती रोडवरील सीकेपी हॉल आणि हिरण्य इमारतीसमोरील झाड उन्मळून चार जण जखमी झाले. पण दादरमध्ये या भागातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा महापालिनं केला तेव्हा त्याला स्थानिकांकडून तीव्र विरोध केला गेला. स्थानिकांकडून होणाऱ्या विरोधामुळेच या भागातील झाडांची छाटणी योग्यप्रकारे होऊ शकलेली नसल्याची बाब समोर आली. मात्र, या घटनेनंतर मारुती रोडवरील सर्व झाडांची छाटणी करून त्यांचं केवळ खोडच ठेवण्यात आलं आहे.


याला स्थानिकांचा विरोध

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारे मोठा पाऊस आल्यामुळे या झाडाच्या आडोसाला उभ्या राहिलेल्यांच्या अंगावर हे झाड कोसळलं. त्यानंतर रविवारी या रोडवर असलेल्या सर्वच झाडांची छाटणी ट्री कटिंग मशिनद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये या झाडांची खोड ही पाने दिसेपर्यंत ठेवून उर्वरीत वरील भाग कापून टाकण्यात आला आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी ही यापूर्वीही करण्याचा वारंवार प्रयत्न होत होता. परंतु महापालिकेचे कर्मचारी या झाडांच्या फांद्या छाटण्यास गेल्यास येथील स्थानिकांकडून विरोध व्हायचा, असं त्यांनी म्हटलं आहे. स्थानिक रहिवाशी कुणाल बिरवाडकर नावाच्या व्यक्तीनं तर महापालिकेच्याविरोधात झाडं कापली जात असल्यानं एफआयआरही केला आहे. तसंच कर्मचाऱ्यांना पकडून ते पोलिस ठाण्यात घेऊन जायचे. त्यामुळे या भागातील झाडांच्या छाटणीत वारंवार अडसर आणला जात असल्याची खंतच उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केली आहे.


तर झाडही वाचलं असतं...

दादरमधील अनेक झाडांच्या फांद्यांची छाटणी अशाचप्रकारच्या स्थानिकांच्या विरोधामुळे होत नाही. परंतु चार दिवसांपूर्वी दादरमधील भवानीशंकर रोडवर पडलेलं भेंडींचं झाड आणि शनिवारी पडलेलं हे गुलमोहराचं झाड जर पाहिलं तर आतून पोखरलेलं होतं. वरून ही झाडं मजबूत दिसत असली तरी आतून पोखरलेली आहेत. त्यामुळे किमान या झाडांच्या फांद्या छाटल्या असत्या तर आज हे झाड वाचलं असतं आणि जी दुघर्टना घडली तीही टाळता आली असती, असं परदेशी यांनी म्हटलं आहे.


अनधिकृत कारपार्किंग, वाहतुकीचाही अडथळा

दादरमधील झाडांच्या फांद्या छाटणी अजून येणारा अडसर म्हणून अनधिकृत कार पार्किंग आणि वाहतूक. रस्त्यांच्या कडेला गाड्या पार्क केल्यामुळेही अनेकदा झाडं कापता येत नाही. त्यामुळे मारुती मार्गावरील काही झाडांची छाटणी करून त्यांची खोड ठेवण्यात आली आहे. परंतु उर्वरीत झाडं ही या रस्त्यावरील वाहतूक थांबवून तसेच गाड्या हटवून केली जाणार आहे. ही खोड येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पानांनी बहरेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र जे झाड उन्मळून पडलं त्याठिकाणी बकूळाचं किंवा नागचंपा आदींचे झाडं लावण्यात येईल,असंही त्यांनी म्हटलं आहे. जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी यासाठी लागणारी सर्व यंत्रणा उद्यान विभागाला उपलब्ध करून दिली असून जिथं जिथं झाडं धोकायदाक वाटेल, त्यांची छाटणी ट्री कटिंगद्वारे करून घेतली जाणार असल्याचं सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा