Advertisement

वांद्र्यातील ४९ झाडांना आतून लागली किड


वांद्र्यातील ४९ झाडांना आतून लागली किड
SHARES

मुंबईत सध्या झाडं उन्मळून पडून दुघर्टना घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशात वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी परिसरात चक्क ४९ चांगल्या दिसणाऱ्या झाडांना आतून किड लागल्याची बाब समोर आली आहे. माऊंट मेरी रेसिडेंसी असोशिएशनने खासगी संस्थेच्या माध्यमातून या भागातील १९० झाडांचा सर्वे केला. नामांकीत संस्थेमार्फत केलेल्या या सर्वेमध्ये ४९ झाडांना आतून किड लागल्याचं आढळून आलं. त्यामुळे ही झाडं कापण्यासाठी असोशिएशन प्रयत्न करत आहे. परंतु, महापालिकेचे अधिकारी ते कापू देत नाही आणि त्या असोसिएशनलाही कापण्यास परवानगी देत नसल्याची खंत काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी व्यक्त केली.

 

उद्यान विभागाला टार्गेट

नुकतंच दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या आवारातील झाड पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर महापालिका सभागृहात यावर मोठी चर्चा होऊन उद्यान विभागाच्या कारभारावरच चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र यानंतरही या खात्याच्या कारभारात कोणताही बदल झालेला नसल्याचं सांगत सभागृहनेते विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे पुन्हा एकदा उद्यान विभागाला टार्गेट केलं.


सपाचे रईस शेख यांची मागणी

शनिवारी रात्री दहिसर येथे नारळाचं झाड पडून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर त्याला २४ तास उलटत नाही तोच दादर पश्चिम येथील मारुती रोडवर गुलमोहराचं झाड पडून एका कुटुंबातील चार जण जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यातील २० वर्षीय मुलगी गंभीर जखमी आहे. सहा माणसांना उचलत नसलेलं झाडाचं खोड तिच्या अंगावर पडलेलं होतं. यामुळे तिच्या पाठीच्या मणक्याला मार लागला आहे. तिच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्यावरील उपचाराचा खर्च महापालिकेने उपलब्ध करून देण्याची मागणी राऊत यांनी केली. धोकादायक झाडं कुठे आणि किती आहेत? याची माहिती गोळा करून ती शास्त्रोक्तपणे कापली जावीत, अशी मागणी सपाचे रईस शेख यांनी केली.


यामुळे कोसळतात झाड

शिवसेनेचे संजय घाडी यांनी दहिसरमधील मृत मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत गृहनिर्माण संकुलातील झाडांची छाटणी निशुल्क करून देण्याची मागणी केली. पदपथावर लावण्यात येणाऱ्या पेव्हरब्लॉक आणि रस्त्यांचं सिमेंटीकरण यामुळे मोठी डेरेदार झाडंही कोसळू लागली आहे. त्यामुळे रस्त्यालगत झाडांभोवती पेव्हरब्लॉक किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येवू नयेत तसेच अशाप्रकारच्या सर्व झाडांचा सर्वे करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली.


कंत्राटदार नेमण्याची मागणी

भाजपचे अभिजित सामंत यांनी वृक्षांची लागवड आणि जोपासना होणं आवश्यक आहे. त्यासाठी वाढलेल्या प्रत्येक झाडांच वय आणि आरोग्य तपासलं गेलं पाहिजे, असं सांगितलं. प्रत्येक परिमंडळांऐवजी विभाग निहाय झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकरता कंत्राटदार नेमण्याची मागणी अलका केरकर यांनी केली तर राजुल पटेल यांनी दुघर्टनेत जे मृत अथवा जखमी झाले आहेत, त्यांना भरपाई देण्याची मागणी केली.


धोकादायक झाडांवर कारवाई

वाढत्या सिमेंटीकरण आणि पेव्हरब्लॉकमुळेच ही झाड पडत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आता झाडांच्या मुळांवर येणारं हे सिमेंट काँक्रिटीकरण थांबवा, अशी मागणी केली आहे. तसेच प्रत्येक विभागात उद्यान विषयक तज्ज्ञ नेमला जावा, अशी मागणी राजा यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्व धोकादायक झाडांवर कारवाई करून जखमी मुलीला महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश प्रशासनाला दिले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा