पारसिक हिल्सच्या संवर्धनासाठी पर्यावरणवादी सरसावले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पर्यावरणवादी पारसिक हिल्सच्या संवर्धनासाठी सरसावले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खाणकामाच्या नावाखाली सुरुंग स्फोट घडवून आणले जात आहेत. नवी मुंबईच्या या पट्ट्यात येणाऱ्या या टेकडी परिसराचा ऱ्हास त्वरीत थांबवण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

गेली कित्येक वर्ष खाणकाम सुरू असून, त्यामुळे पर्यावरण आणि नयनरम्य टेकडीचे मोठे नुकसान होत असल्याचे 'एकविरा आई प्रतिष्ठान' सामाजिक संस्थेचे संचालक नंदू पवार यांनी म्हटले. पारसिक टेकडीचा विनाश आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. हे थांबवण्यासाठी आम्ही राष्ट्रीय हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

सोशल मीडियावर या मोहिमेचे लाँचिंग करण्यासोबत change.org या संकेतस्थळावर याचिका दाखल केली असून, त्याद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यासोबत युट्युबवर यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. खाण क्षेत्रात दगडाची खडी करण्याच्या कामामुळे जे ध्वनी प्रदूषण होते, ते शेकडो पटीने अधिक असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील स्पष्ट केले आहे.

खाणकामामुळे जैव विविधता, जंगल आणि जलसंपदा धोक्यात आली आहे. पारसिक हिल्सचा भाग हा इको टुरिझम आणि साहसी क्रीडा प्रकार राबवण्यासाठी केला पाहिजे. तसेच येथील सुंदर वनांचे आणि डोंगरांचे जतन केले पाहिजे.

- डी. स्टॅलिन, संचालक, वनशक्ती संस्था

खाणकामामुळे या परिसरात निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, येथील जनतेच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत असल्याचे कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष बी एन कुमार यांनी म्हटले.


हेही पहा -

संतुलन पर्यावरण स्वच्छता अभियानाचे...!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

चित्रकलेतून पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी केली जनजागृती


पुढील बातमी
इतर बातम्या