गणेशोत्सव मंडपाच्या आसपास खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना बंदी

मुंबईत गणेशोत्सवात भाविक मोठ्या संख्येने विविध मंडळांना भेटी देत असतात. ही गर्दी लक्षात घेऊन मंडपाशेजारी अनेक खाद्यपदार्थांची दुकाने तसंच स्टॉल्स लावले जातात. परंतु उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेता मंडपाशेजारील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टॉल्स लावण्यास पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. बंदीनंतरही जे खाद्यपदार्थ विक्रेते मंडपाशेजारी स्टाॅल लावतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

बैठकीत निर्णय

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसंच खात्यांचे प्रमुख यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सवसंदर्भातील महापालिकेच्यामाध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला.

सार्वजनिक खात्याला निर्देश

गणेशोत्सवाच्या निमित्तानं साथीच्या आजारांबद्दल प्रबोधन करण्याचे आदेश सार्वजनिक खात्याला देण्यात आले आहेत. यांतर्गत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी प्रबोधनात्मक पोस्टर लावणे, तसेच गणेश मंडळांना प्रबोधनात्मक ध्वनीफिती व चित्रफितींचे वाटप करून त्यांचा गणेशोत्सव कालावधीत नियमित उपयोग करण्याची विनंती गणेशमंडळांना करण्याचे निर्देशही आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

स्वच्छताविषयक अंमलबजावणी

या कालावधीत उघड्यावरील अन्नपदार्थ, पेय पदार्थ, निकृष्ट दर्जाचा बर्फ यावर मोहीम स्वरुपात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबरोबरच या कालावधीत अधिकाधिक स्वच्छता राहावी याकरीता यासाठी सर्व विभाग कार्यालयांनी आपल्या मनुष्यबळाचे व स्वच्छताविषयक कार्यवाहीचे व्यवस्थित नियोजन व अंमलबजावणी करावी, अशाही सूचना त्यांनी केली.


हेही वाचा-

गणपती विर्सजनासाठी समुद्रात उभारणार लाईटचे टॉवर

प्लास्टिक बंदीसाठी महापालिका बाप्पाच्या दरबारी


पुढील बातमी
इतर बातम्या