१० दिवसांत दुसऱ्यांदा घसरली माथेरानची मिनी ट्रेन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माथेरानची राणी अशी ओळख असलेल्या मिनी ट्रेनची सेवा मागील १० दिवसांत दुसऱ्यांदा ठप्प झाली. जुमापट्टी आणि वाॅटर पाइपलाइन स्थानकांदरम्यान या ट्रेनचे डबे घसरल्याने गुरुवारी पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याआधी ९ डिसेंबरला मिनी ट्रेनचे डबे रुळांवरुन घसरले होते.

अपघाताचं सत्र सुरूच

माथेरानच्या मिनी ट्रेनला ८ डिसेंबर रोजी एसी कोच जोडण्यात आला होता. त्यानंतर ही ट्रेन ९ डब्यांची झाली आहे. २०१५ मध्ये अपघात झाल्यानंतर या मार्गाच्या दुरूस्तीसाठी तब्बल अडीच वर्षे हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीनंतर माथेरान - नेरळ सेवा सुरू झाली खरी; परंतु ट्रेन ठप्प पडण्याची सत्र अद्यापही कायम आहे.

चिंता वाढली

गुरूवारी ट्रेन रुळांवरून झाल्याने कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नसलं, तरी ट्रेन वारंवार घसरत असल्याने प्रवाशांसोबतच मध्य रेल्वेची चिंता वाढली आहे. या घटनेनंतर मिनी ट्रेनची सेवा अर्ध्या तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.

असं असलं, तरी या ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. ट्रेनमध्ये एअरब्रेक सिस्टिम असल्याने चालकाचं ट्रेनवर पूर्णपणे नियंत्रण राहत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

मिनी ट्रेनच्या एसी बोगीमुळे मध्य रेल्वेला ७८ हजार रुपयांची कमाई

आता फॅमिली पिकनीकसाठी बुक करा माथेरानची मिनी ट्रेन


पुढील बातमी
इतर बातम्या