अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी निवडला 'हा' मार्ग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनामुळं राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमांमुळं अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, त्यामुळं लोकलसेवेवर आलेले निर्बंध यांचा परिणाम मुंबईच्या डबेवाल्यांवर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ ते ४ हजार डबेवाल्यांपुढे उपजीविकेचा प्रश्न उभा ठाकला असून, अनेकांनी मिळेल ते काम स्वीकारले आहे.

ऑनलाइन कुरिअर डिलिव्हरी, फ्लिपकार्ट तसेच ऑनलाइन शॉपिंगच्या संकेतस्थळांसाठी घरपोच सेवा देण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे. तर अनेकांनी हॉटेल्समधून पार्सल घरी नेऊन देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. काही डबेवाल्यांनी भाजीविक्री, गावी जाऊन शेती करण्याचा पर्यायही स्वीकारला होता. मात्र त्यातून पुरेशी मिळकत नसल्याने हताश झालेले डबेवाले लोकलमध्ये प्रवासाची संमती केव्हा मिळते, करोना केव्हा संपतो याकडे नजर लावून बसले आहेत.

काही कंपन्यांनी ऑनलाइन बुकिंग केलेल्या वस्तू घरपोच देण्यासाठी डबेवाल्यांची सुविधा मागितली होती. त्यात काहीजण काम करत आहेत. तर काहींनी हॉटेल्समधील पार्सल घरपोच नेऊन देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. बंद असलेली कार्यालये, सर्वांसाठी नसलेली लोकलसेवा यामुळे डबेवाले बाहेर पडू शकत नाही. प्रवासाची संमती मिळाल्यास रोजगाराचा बिकट प्रश्न सुटण्यास थोड्या-फार प्रमाणात मदत होईल, अशी अपेक्षा डबेवाल्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

सरकारनं 'युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास' यंत्रणेत डबेवाल्यांचाही समावेश करावा. त्यामुळं डबेवाल्यांना मुंबई लोकलची तिकीटे व पास उपलब्ध होतील, अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या