रस्ते घोटाळ्याप्रकरणी ६ अभियंते बडतर्फ, एकूण १८५ दोषी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणी अखेर अंतिम चौकशी अहवाल जाहीर झाला असून यामध्ये एकूण १८५ अभियंत्यांपैकी केवळ ५ अभियंते निर्दोष सुटले आहेत. उर्वरित १८० अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये ६ दोषी अभियंत्यांना बडतर्फ करून सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये एक उपप्रमुख अभियंता, एक सहायक अभियंता आणि चार दुय्यम अभियंत्यांचा यामध्ये समावेश आहे.

२३४ रस्ते कामांची झाली चौकशी

रस्ते कामातील भ्रष्टाचाराबाबत तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली होती. या कालावधीत हाती घेतलेल्या २३४ रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने पहिला अहवाल सादर केल्यानंतर अभियंत्यांवर कारवाई करण्यासाठी उपायुक्त रमेश बांबळे आणि प्रमुख चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांनी प्रथम ३४ आणि त्यानंतर २०० रस्त्यांची अशा एकूण २३४ रस्त्यांच्या कामांची चौकशी पूर्ण करून आपला अहवाल सादर केला. त्यानुसार या रस्त्यांच्या एकत्र चौकशीचा अहवाल अजोय मेहता यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सादर करत जाहीर केला.

पहिल्या टप्प्यात झाली १०० अभियंत्यांची चौकशी

या दोन टप्प्यांत २३४ रस्त्यांची चौकशी पूर्ण करण्यात आली. त्यात एकूण १८५ अभियंत्यांची चौकशी झाली. यापैकी १८० अभियंत्यांना दोषी, तर ५ अभियंत्यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. ३४ रस्त्यांच्या चौकशीच्या पहिल्या टप्प्यात १०० अभियंत्यांची चौकशी झाली होती. यामध्ये ९६ अभियंत्यांना शिक्षा करण्यात आली होती. तर या १०० अभियंत्यांपैकी ८४ अभियंते हे चौकशीच्या दुस-या टप्प्यात म्हणजेच २०० रस्त्यांच्या चौकशीतही दोषी आढळून आले.

६ अभियंते बडतर्फ

दुसऱ्या टप्प्यात या ८४ शिवाय ८५ नवीन अभियंत्यांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण २३४ रस्ते प्रकरणी १८५ अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. दुस-या टप्प्यात सामाईक अभियंत्यांना शिक्षा देताना दोन्ही पैकी जी जास्त असेल ती शिक्षा देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. ३४ रस्ते कामांच्या चौकशीत बांबळे समितीने ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. परंतु, हे चारही अधिकारी २०० रस्त्यांच्या कामातही दोषी आढळून आल्यामुळे, तसेच दोन अन्य दुय्यम अभियंत्यांचा सहभाग अधिक असल्याने या सर्वांना जास्तीत जास्त शिक्षा म्हणून सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

अशा प्रकारे झाली कारवाई

० बडतर्फ झालेले अभियंते : ६

० पदावनत / मूळ वेतनावर परत आणलेले अभियंते : २३

० निवृत्ती वेतनात कपात केलेले अभियंते : ६

० ३ वर्षांसाठी कायम वेतनवाढ बंद करण्यात आलेले अभियंते : १३

० २ वर्षांसाठी कायम वेतनवाढ बंद करण्यात आलेले अभियंते : १७

० १ वर्षासाठी कायम वेतनवाढ बंद करण्यात आलेले अभियंते : ६७

० १ वर्षासाठी वेतनवाढ तात्पुरती बंद करण्यात आलेले अभियंते : ३१

० दंड करण्यात आलेले अभियंते : १६

० ताकीद देण्यात आलेले अभियंते : १

० निर्दोष ठरवलेले अभियंते : ५


हेही वाचा

रस्ते घोटाळ्यावर शिवसेना, भाजपाचे मौन

पुढील बातमी
इतर बातम्या