एल्फिन्स्टन ब्रिजचा प्रवाशांकडूनच वापर सुरु, अधिकृत घोषणा मात्र नाही!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

२९ सप्टेंबर २൦१७ ला एल्फिन्स्टन पूल दूर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. अनेकांनी अनेक तर्कवितर्क लावले. पूल अरुंद असल्याचं सांगितलं. एल्फिन्स्टन पूल दूर्घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ पादचारी पूलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पुलासह, मध्य रेल्वेवरील करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पुलाचं काम ३१ जानेवारी पर्यंत भारतीय सैन्य दलाकडून करुन घ्यायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

प्रवाशांनीच सुरु केला वापर!

या तीन पुलांपैकी एल्फिन्स्टन पुलाचं काम पूर्ण झालं असून तो पूल प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. याची घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून झाली नसली, तरी या पुलाचा वापर प्रवासी करताना दिसून येत आहेत. शिवाय, हा पूल १ जानेवारीपासून प्रवासी वापरत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

दुर्घटना घडली तर जबाबदारी कुणाची?

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून हा पूल वापरण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच, लष्कराकडूनही याबाबत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे जर इथे कोणती दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे मात्र अनिश्चित आहे.

३१ जानेवारीपर्यंत पूल पूर्ण करण्याचं टार्गेट

या पुलाच्या बांधणीला ५ नोव्हेंबरपासून सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतर हे तिन्ही पूल ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानुसार ते काम लष्कराच्या जवानांना सोपवण्यात आलं.

एल्फिन्स्टन स्थानकाचा पूल अरुंद असल्याकारणाने २९ सप्टेंबरला चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, जवळपास ३३ प्रवासी जखमी झाले होते.


हेही वाचा

एल्फिन्स्टन दुर्घटना: मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचंच- उच्च न्यायालय

पुढील बातमी
इतर बातम्या