महिला बचत गटांना वाहनतळांचे कंत्राट - निविदांसाठी २ ऑगस्टची अंतिम तारीख

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील सशुल्क वाहनतळांच्या कंत्राटांमध्ये महिला बचत गटांना ५० टक्के कंत्राटं राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्षात महिला बचत गटांना कंत्राट देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. या कंत्राटासाठी महापालिकेच्या वतीने निविदा मागवण्यात येत असून महिला बचत गटांना २ ऑगस्टपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.

९१ वाहनतळांसाठी निविदा

रस्त्यालगत असलेल्या वाहनतळ योजनेंतर्गत मुंबईत ९१ ठिकाणी सशुल्क वाहनतळ आहेत. या सशुल्क वाहनतळासाठी निविदा मागवण्यात येत असून यामध्ये ५० टक्के महिला बचत गट, २५ टक्के सुशिक्षित बेरोजगार संस्था आणि उर्वरीत २५ टक्के वाहनतळ ही सर्वसाधारण गटांसाठी आहे. या सर्व गटांसाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरु असल्याची माहिती प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) विनोद चिठोरे यांनी दिली आहे.

तीन गटांमध्ये निविदा प्रक्रिया

टप्पासंस्थामुदत
पहिला टप्पासुशिक्षित बेरोजगार संस्था23 जून ते 20 जुलै 2017
दुसरा टप्पामहिला बचत गट

7 जुलै ते 2 ऑगस्ट 2017
तिसरा टप्पासर्वसाधारण गट27 जुलैपर्यंत

या प्रक्रियेनुसार जी संस्था आणि गट अधिकतम बोली लावेल आणि पात्र ठरेल त्यांची निवड वाहनतळासाठी करण्यात येईल, असे विनोद चिठोरे यांनी स्पष्ट केले.

न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे...

मुंबईतील सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटात काही मोजक्या कंत्राटदारांची मक्तेदारी असल्यामुळे ही कंत्राटे रद्द करण्याची मागणी करून महापालिकेने ही कंत्राटे महिला बचत गटांच्या संस्था, सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्था यांना दिल्या जाव्यात, अशी मागणी केली होती. तर २५ टक्के वाहन तळ हे सर्वसाधारण गटासाठी खुले ठेवण्यात यावेत, अशा प्रकारचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. परंतु या ठरावाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून महापालिकेत ठराव होऊनही महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्था या कंत्राटापासून वंचित होत्या. परंतु न्यायालयाने या प्रकरणी आदेश देत वाहनतळांसाठी बचत गटांच्या संस्थांना काम देण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने कंत्राटासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

मुंबईतल्या उड्डाणपुलांखाली आता 'नो पार्किंग' झोन!

पुढील बातमी
इतर बातम्या