Advertisement

मुंबईत आता ऑनलाईन कारपार्किंग!


मुंबईत आता ऑनलाईन कारपार्किंग!
SHARES

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेने ठिकठिकाणी नवीन वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरीही वाहनांसाठी ही जागा अपुरीच पडते. बऱ्याचदा वाहनतळांवर जागा नसल्याने वाहनचालकांना नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन उभे करावे लागते. पुढे होणारा गाेंधळ सर्वांनाच ठाऊक आहे. वाहनचालकांची ही गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने आता सिनेमागृहातील आसनांप्रमाणे वाहनतळातील जागांचेही ऑनलाईन बुकिंग करण्याचा पर्याय वाहनचालकांना देऊ केला आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना घरबसल्या कुठल्या वाहनतळावर कार पार्किंगसाठी किती जागा उपलब्ध आहेत? हे कळू शकणार आहे.

प्राथमिक चाचणी यशस्वी -
दक्षिण मुंबईतील आठ वाहनतळांवर या ऑनलाईन सुविधेची प्राथमिक चाचणी यशस्वी ठरल्यानंतर ऑनलाईन नोंदणीची ही सेवा वाहनचालकांसाठी खुली करण्यात येत आहे. यामुळे कॉफर्ड मार्केटसह फोर्ट, काळाघोडा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करून आपल्या वाहनासाठी आधीच जागा राखून ठेवता येणार आहे. मुंबईतील वाहनतळ धोरणाला मंजुरी मिळाल्यामुळे 'ए' विभागातील वाहन शुल्कात तिपटीने वाढ झाली अाहे. या शुल्कवाढीमुळे 'ए' विभागात गाड्या पार्क करणारे वाहनचालक नाराज होते. त्यांची नाराजी काही प्रमाणात ऑनलाईन नोंदणी सुविधेमुळे दूर होऊ शकते.

पहिल्या टप्प्यात 8 वाहनतळांवर सुविधा -
ऑनलाईन बुकिंग / अॅप आधारित बुकिंग सुविधेच्या पहिल्या टप्प्यात 8 वाहनतळांवर ही सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील 3 वाहनतळांवर 222, हुतात्मा चौकातील 2 वाहनतळांवर 147, काळा घोडाजवळ 50, इरॉस जंक्शनला 42 आणि रिगल सर्कलला 24 याप्रमाणे 8 वाहनतळांवर एकूण 485 जागा वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

अशी काम करेल यंत्रणा -
या वाहनतळांवर ऑनलाईन बुकिंग /अॅप आधारित सेवा पुढील 3 महिन्यांत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बुकिंगची प्राथमिक तांत्रिक चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे. ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहनतळांच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण व अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येतील. या कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रणाचे संगणकीय पद्धतीने विश्लेषण होऊन त्याबाबतची माहिती संकेतस्थळांवर तसेच अॅपद्वारे उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशाप्रकारे करता येईल ऑनलाईन बुकिंग-
ऑनलाईन जागेचे बुकिंग केल्यानंतर वाहनधारकाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच अॅपवर एक लघुसंदेश (SMS) येईल. यामध्ये वाहनतळाचा पत्ता, जागा क्रमांक, बुकिंगचा कालावधी, वाहनक्रमांक आदी तपशील असेल. याच ‘एसएमएस’ची एक प्रत वाहनतळावर कार्यरत असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यालासुद्धा प्राप्त होईल. विशेष म्हणजे प्रस्तावित अॅपद्वारे वाहनचालकाला वाहनतळापर्यंत जाण्याचा मार्गदेखील जीपीएसच्या सहाय्याने दिसू शकेल.
संबंधित वाहन वाहनतळावर पोहचल्यानंतर तेथील कर्मचारी वाहन क्रमांकाची खातरजमा करुन लगेचच तेथील प्रवेशद्वार उघडेल व वाहन पार्किंग करण्यास सहकार्य करेल. विशेष म्हणजे बुकिंग केल्यानंतर निर्धारित करण्यात आलेल्या कालावधी दरम्यान वाहन वाहनतळावर आले नाही, तर सदर 'ऑनलाईन बुकिंग' आपोआप रद्द होऊन ती जागा दुसऱ्या वाहनास उपलब्ध करुन देता येऊ शकेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा