वाहनतळांची कंत्राटे महिला बचत गट आणि अपंगांच्या संस्थांना

 BMC
वाहनतळांची कंत्राटे महिला बचत गट आणि अपंगांच्या संस्थांना

मुंबई - मुंबई महापालिकेच्यावतीने मंजूर करण्यात आलेल्या आणि राज्य सरकारने स्थगिती दिलेले सशुल्क वाहनतळाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रयोगिक तत्वावर महापालिकेच्या ‘ए’ विभाग अर्थात कुलाबा, नरिमन पॉईंट, फोर्ट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी भागांमध्ये हे सुधारीत धोरण लागू करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात वाहनतळासाठी तासाला चाळीस ते साठ रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये महिला बचत गट, अपंग संस्था आणि खुल्या गटांना वाहनतळांची कंत्राटे दिली जाणार आहेत.

मुंबईत सशुल्क वाहनतळांसाठी बनवण्यात आलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीकोनातून ‘ए’ विभाग कार्यालयांच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष राजेश कोकीळ यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत महापालिका सभागृहाची मंजुरी घेण्यापूर्वी याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते,असा सवाल उपस्थित केला. यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मुंबईतील 91 वाहनतळांसाठी हे सशुल्क वाहनतळ बनवण्यात आले होते. 

सन 2014-15मध्ये सुधार समिती आणि महापालिकेच्या मान्यतेनुसार महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार रात्रीच्यावेळी वाहने उभे करण्यास तसेच घराबाहेर वाहने उभे करण्यास परवानगी मिळाली आहे. या प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतर महापालिकेच्या मान्यतेनुसार संपूर्ण शहरात याची अंमलबजावणी केली जाईल. या वाहनतळाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका होती, या याचिकेचा निकाल महापालिकेच्यावतीने लागला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने वाहनतळाचे कंत्राट देण्याबाबत बनवलेल्या ठरावानुसार महिला बचत गटांसाठी 50 टक्के, अपंग संस्थांना 25 टक्के आणि खुल्या प्रवर्गांसाठी 25 टक्के याप्रमाणे वाहनतळाचे कंत्राट दिले जाणार आहे. 

वाहनतळ आणि शुल्क वाढीच्या या धोरणामुळे दक्षिण मुंबईतील वाहनतळांचे शुल्क हे उपनगरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे वाहनतळाचे धोरण बनवताना श्रीमंत वस्ती तथा व्यापारी भाग तसेच मध्यमवर्गीय आणि गरीब वस्ती याप्रमाणे तीन भागांमध्ये वर्गवारी करून चारचाकी वाहनांसाठी एक तासांकरता अनुक्रमे 60 रुपये, 40 रुपये आणि 20 रुपये असा दर निश्चित केला आहे. वाहनशुल्क वाढीला तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली. परंतु आज 2017 उजाडले आहे. त्यावेळी अनाधिकृत वाहनतळ आणि याठिकाणी मक्तेदारी असलेल्या अख्तर या कंत्राटदाराविरोधात रान उठल्यामुळे हे धोरण बनवले गेले होते, असे माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी सांगितले. परंतु आता जर याची अंमलबजावणी होणार असेल तर महापलिका सभागृहातील ठरावानुसार महिला बचत गट, अपंग संस्थांना कंत्राट देण्याबाबत प्रशासन काय अंमलबजावणी करणार आहे, याची विचारणा जाधव यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत दिलीप लांडे, किशोरी पेडणेकर, अश्रफ आझमी आदींनी चर्चेत भाग घेतला होता.

धोरणाच्या प्रस्तावाचा फेरविचार व्हावा - रवीराजा, गटनेते, काँग्रेस
महापालिका सभागृहात आणि सुधार समितीत शिवसेना आणि भाजपाने हे धोरण मंजूर केले आणि मगरीचे अश्रू ढाळण्याचा प्रयत्न ते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते रविराजा यांनी केला. त्यामुळे या सशुल्क वाहनतळाला विरोध असून याचा फेरविचार व्हावा. मुंबईकरांवर वाहनतळाचा बोजा पडू नये,अशी सूचना त्यांनी केली.

धोरणाच्या अंमलबजावणीला पाठिंबा- मनोज कोटक, भाजपा
या धोरणामुळे जे जास्त वाहन शुल्क घेतात, आणि अनधिकृत चालवतात त्याला लगाम बसेल. अख्तरसारखे कंत्राटदार वर्षानुवर्षे वाहनतळाची कंत्राटे मिळवून लूट करत होते. त्यामुळे हे धोरण आणले होते. ‘ए’ विभागात प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे. काहींना पैसे देऊन वाहनतळ हवे, तर काहींचा विरोध आहे. त्यामुळे दोन्ही वर्गांच्या प्रतिक्रीया लक्षात घेऊन पुढील भूमिका भाजपा स्पष्ट करेल,असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.

लोकांच्या मागणीनुसारच धोरणाची अंमलबजावणी- यशवंत जाधव, सभागृहनेते
मुंबईकरांच्या हितासाठीच वाहनतळ आणि सशुल्क वाढीचे धोरण आणलेले आहे. चाळी आणि इमारतींमध्ये जे लोक राहतात आणि वाहने जागा नसल्यामुळे रस्त्यावर लावावे लागतात,त्यांच्यासाठी हे धोरण गरजेचे आहे. याला कुणाचाही विरोध नसून, लोकांसाठी हे धोरण राबवण्यात येत असल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही विरोध करून याचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

अ श्रेणीतील वाहन शुल्काचे दर (ताशी)
विभाग : कुलाबा ते माटुंगा-माहिम-धारावी-वांद्रे ते सांताक्रुझ, अंधेरी –जोगेश्वरी, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, मालाड, बोरीवली
चारचाकी : 60 रुपये, दुचाकी 15 रुपये, ट्रक 90 रुपये, रिक्षा-टॅक्सी 30 रुपये, सार्वजनिक बस 65 रूपये


‘ब’ श्रेणीतील वाहन शुल्काचे दर (ताशी)
विभाग : फोर्ट, नरिमन पॉईंट, चंदनवाडी, ग्रँट रोड, वरळी, प्रभादेवी
चारचाकी : 40 रुपये, दुचाकी 10 रुपये, ट्रक 60 रुपये, रिक्षा-टॅक्सी 20 रुपये, सार्वजनिक बस 45 रूपये


‘क’ श्रेणीतील वाहन शुल्काचे दर (ताशी)

विभाग : ग्रँटरोड, बी.डी माझदा अपार्टमेंट, घाटकोपर-माहुल रोड एम-पश्चिम
चारचाकी : 20 रुपये, दुचाकी 5 रुपये, ट्रक 30 रुपये, रिक्षा-टॅक्सी 10 रुपये, सार्वजनिक बस 25 रूपये

Loading Comments