आपल्यापैकी प्रत्येकालाच मुंबईत पार्किंगच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. त्यात आता दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांची संख्या बघता हा प्रश्न अधिकच बिकट होत जाणार यात शंका नाही. अशा वेळी शहरभर जाळं असणाऱ्या उड्डाणपुलांचा मोठा आधार आपल्याला वाटतो. मात्र आता तो आधारसुद्धा लवकरच जाणार आहे. कारण मुंबईतल्या उड्डाणपुलांखालची जागा 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांना लवकरच ही जागाही खाली करावी लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी(महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) आणि एमएमआरडीए(मुंबई महानगर विकास प्राधिकरण) यांच्या अखत्यारीत असणारे मुंबईत सुमारे 350हून अधिक उड्डाणपूल आहेत. यातल्या अनेक उड्डाणपुलांच्या खाली वाहन पार्किंग केले जाते. मात्र आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उड्डाणपुलाखाली गाडी पार्क करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत. उड्डाणपुलाखाली गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या आधी सरकारने उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचाही निर्णय घेतला होता.
मुंबईकर प्रणव पोलिकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईतील पुलाखाली वाहनतळ उभारणे म्हणजे मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात घालण्यासारखे आहे. दहशतवाद्यांनी मनात आणले तर मोठा घातपात होऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले होते. त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार राज्य सरकारने उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग झोन' घोषित केला आहे. यामुळे आता वाहन पार्क कुठे करायचे? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
हे देखील वाचा -
माहिम उड्डाणपुलावर 'पार्किंग दादा'ची मनमानी
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)