माहिम उड्डाणपुलावर 'पार्किंग दादा'ची मनमानी

MAHIM
माहिम उड्डाणपुलावर 'पार्किंग दादा'ची मनमानी
माहिम उड्डाणपुलावर 'पार्किंग दादा'ची मनमानी
माहिम उड्डाणपुलावर 'पार्किंग दादा'ची मनमानी
माहिम उड्डाणपुलावर 'पार्किंग दादा'ची मनमानी
See all
मुंबई  -  

धारावी - माहिम-धारावी उड्डाण पुलावरील नो पार्किंग झोनच्या जागेला काही स्थानिक दादांनी पार्किंगचा अड्डा बनवल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या अवैध धंद्याकडे ना वाहतूक पोलिसांचे लक्ष ना पालिका प्रशासनाचे. त्यामुळे हा अवैध धंदा दिवसेंदिवस तेजीत सुरू आहे.

धारावी - माहिम उड्डाणपूल एकमात्र जोडरस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे 2012 साली उडाणपुलाच्या नाल्यावरील रस्त्याचा काही भाग कोसळून मोठा अपघात झाला होता. या मार्गावरून भुयारी मार्ग जाणार असल्याने या पुलाची आजतागायत डागडुजी झाली नाही. प्रशासनाकडून कोसळलेल्या भागाला पत्र्याचे पार्टिशन लावून उड्डाणपुलाच्या काही भाग एकमार्गी करण्यात आला. याचाच फायदा घेत येथील स्थानिक दादांनी पार्किंगचा धंदा सुरू केल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक फक्रूल शेख यांनी केला आहे. या अवैध पार्किंगमुळे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलीस या अवैध पार्किगकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचा आरोप येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी केला आहे.

धारावी-माहिम जोडरस्त्यावर नुकतेच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर कंत्राटदाराने सुरक्षा भिंत उभी केली असून या सुरक्षा भिंतीमुळे रस्ता अरुंद झाला असल्याने नो पार्किंगचा फलकही या भिंतींवर लावण्यात आला आहे. असे असतानाही स्थानिक दादांनी पैसे घेऊन पार्किंगचा धंदा सुरू ठेवला आहे. याकडे वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन लक्ष देण्यास का तयार नाहीत? असा सवाल स्थानिक समाजसेवक फक्रूल इस्लाम शेख यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत वाहतूक पोलीस उपाआयुक्त संजय मोहिते यांच्याकडे मुंबई लाइव्हने विचारणा केली असता संबंधित माहिती देण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पोलीस उपाआयुक्त (जनसंपर्क) अश्विनी सानप यांच्याशी संवाद साधला असता सदरील विषयाबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करून देण्यात येईल असे सानप यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.