मुंबईत 7 हजार 856 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेने डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लू या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत. पण, तरीही डेंग्यू, मलेरिया झालेल्या रुग्णांची संख्या मात्र कमी होत नाहीये. महापालिकेने डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्या सापडू नयेत म्हणून जनजागृती कार्यक्रमही राबवले. पण, अजूनही पालिकेच्या या उपक्रमाला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे.

7 हजार 856 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या

1 जानेवारी ते 15 जुलै या साडेसहा महिन्यांच्या कालावधीत 7 हजार 856 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आणि 2 हजार 674 ठिकाणी मलेरिया डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. ही सर्व ठिकाणे तत्काळ नष्ट करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे किटकनाशक विभाग अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

साडेसहा महिन्यांत 62 लाख घरांची तपासणी

1 जानेवारी ते 15 जुलै या साडे 6 महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील जवळपास 62 लाख 43 हजार 597 घरांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत डेंग्युच्या अळ्या आढळलेल्या घरांना 8 हजार 744 नोटीशी देण्यात आल्या आहेत. या घरांनी डेंग्यु प्रतिबंधक उपाय करणं आवश्यक असल्याचं या नोटिसांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुष्य हे 3 आठवड्यांचे असते. आणि या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान 4 वेळा अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे जवळपास 500 ते 600 अंडी तयार होतात. महापालिका किटकनाशक विभागाकडून नियमितपणे शोध मोहीम सुरु असते. सापडलेली ठिकाणे लगेचच नष्ट करण्यात येत आहे.

- राजन नारिंग्रेकर, किटकनाशक अधिकारी, महापालिका

कशामुळे बजावल्या नोटिसा

  • पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे
  • विहीर डास प्रतिबंधक न करणे
  • डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे

ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्याकडून सहा महिन्यांत 20 लाख 4 हजार 600 रुपये एवढा दंड महापालिकेच्या किटकनाशक विभागाने जमा केला आहे.

कोरडा दिवस पाळण्याची गरज

डासांच्या अळ्या साधारणपणे स्वच्छ पाण्यात 7 दिवसांपर्यंत राहतात. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस तरी सर्व घरातील भांडी धुऊन स्वच्छ करावीत. घरामध्ये किंवा शेजारील परिसरात साचलेले पाणी किंवा साठवलेले पाणी अधिक काळ राहणार नाही याची काळजी घ्यावी.


हेही वाचा -

मुंबईकरांचा पावसाळा आजारात जाणार, डेंग्यु-मलेरियाच्या अळ्या झाल्या दुप्पट!

डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!


 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या