मुंबईकरांचा पावसाळा आजारात जाणार, डेंग्यु-मलेरियाच्या अळ्या झाल्या दुप्पट!

  Mumbai
  मुंबईकरांचा पावसाळा आजारात जाणार, डेंग्यु-मलेरियाच्या अळ्या झाल्या दुप्पट!
  मुंबई  -  

  मुंबईत पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार पसरु लागतात. महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी यंदा ठिकठिकाणी औषध फवारणी केली. या औषध फवारणीनंतर डासांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पालिकेच्या या दाव्यात तथ्य नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांचा यंदाचा पावसाळा आजारात जाण्याची शक्यता आहे. कारण मागच्या दोन महिन्यांत शहरात डासांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. पालिकेच्याच कीटकनाशक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन ही गोष्ट स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात शहरात डेंग्युचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.


  अळ्या वाढल्या

  मुंबईत 1 मे ते 27 जून या दोन महिन्यांत 3,306 ठिकाणी डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. तर, 1283 ठिकाणी मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या एनॉफिलीस स्टिफेन्सी या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.

  यापूर्वी 1 जानेवारी ते 30 एप्रिल या 4 महिन्यांच्या कालावधीत मुंबईत 1,997 ठिकाणी एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. तर, मलेरिया आजाराचा फैलाव करणाऱ्या डासांच्या अळ्या 577 ठिकाणी आढळल्या होत्या.

  परंतु या चार महिन्यांच्या तुलनेत मे आणि जून या दोन महिन्यांतच डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.


  21 लाख घरांची तपासणी

  महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डेंग्युविरोधी मोहीमराबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन महिन्यांत 21 लाख घरांची तपासणी केली. त्यापूर्वी 1 जानेवारी ते 30 एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत 33 लाख 3 हजार 882 घरांची तपासणी करण्यात आली होती. ज्या घरांमध्ये डेंग्यू आणि मलेरिया डासांच्या अळ्या सापडल्या त्या नष्टही करण्यात आल्या होत्या.


  रुग्णसंख्या घटली

  गेल्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मुंबईत जास्त होती. जूनमध्येच 48 जणांना डेंग्यूची बाधा झाली होती. मात्र, या वर्षी जूनपर्यंत मुंबईत डेंग्यूची रुग्णसंख्या 14 इतकीच आहे. ही संख्या वाढू नये, यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून फवारणी करुन डेंग्यु, मलेरिया दूर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत.


  ..तर बिल्डरला होणार शिक्षा  

  घरांमध्ये साचलेल्या पाण्याव्यतिरिक्त रस्ते आणि इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणीही डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्या सापडतात. या प्रकल्पात काम करणारे कामगार प्रकल्पाजवळच तात्पुरती निवासस्थाने उभारुन राहतात. त्यामुळे त्यांना डेंग्यू, मलेरिया होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. या कामगरांना बांधकाम व्यावसायिकांनी मच्छरदाणी पुरविणे आवश्यक असते. पण बहुतांश बांधकाम व्यावसायिक कामगारांना सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा कामगारांना डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यास बांधकाम व्यावसायिकांना शिक्षा होऊ शकते, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  हे देखील वाचा -

  डेंग्यूमुळे विक्रेत्यांची चांदी

  'वन रुपी क्लिनिक'मध्ये मलेरिया, डेंग्यूची चाचणी 500 रुपयांत

  'मुंबईकर खड्डे, मलेरिया आणि पाण्याच्या टँकरमध्ये खूश'  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.