पावसाळ्यापूर्वीच डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे अड्डे उद्ध्वस्त

Mumbai
पावसाळ्यापूर्वीच डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे अड्डे उद्ध्वस्त
पावसाळ्यापूर्वीच डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे अड्डे उद्ध्वस्त
See all
मुंबई  -  

पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया सारख्या प्राणघातक आजारांना वेळीच रोखण्यासाठी महापालिकेच्या किटकनाशक खात्याने धडक मोहीत हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी डेंग्यूच्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या ‘एडिस एजिप्ती’ आणि मलेरियाच्या ‘एनॉफिलीस स्टिफेन्सी’च्या अळ्या सापडल्या आहेत. मागील चार महिन्यांत केलेल्या कारवाईत तब्बल 1 हजार 997 ठिकाणी डेंग्यूच्या तर 577 ठिकाणी मलेरिया वाहक डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीच हे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असले, तरी निष्काळजी मुंबईकरांमुळे पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे आणखी अड्डे तयार होण्याची भिती वर्तवली जात आहे.

पावसाळ्यात साथीच्या आजारांसोबत मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेच्या किटकनाशक विभागाने धडक माेहीम हाती घेतली आहे. जानेवारी महिन्यापासूनही ही कारवाई सुरु असून 30 एप्रिलपर्यंत केलेल्या या कारवाईत डेंग्यू व मलेरियाच्या डासांचे अड्डे आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणी करून हे अड्डे नष्ट करण्यात अाल्याची माहिती महापालिकेचे किटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

निष्काळजी मुंबईकरांना 14 लाखांचा दंड -
1 जानेवारी ते 30 एप्रिल 2017 या चार महिन्यांच्या कालावधीत 33 लाख 3 हजार 882 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ज्या घरांमध्ये डेंग्यू, मलेरियांच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली, त्या घरमालकांवर कारवाई करण्यात आली.

चार महिन्यांच्या कालावधीत 4 हजार 746 जणांना नोटीसा देण्यात आल्या. या नोटीसा प्रामुख्याने पाण्याची टाकी, विहीर डास प्रतिबंधक नसणे, कारंजे किंवा बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे इत्यादी कारणांसाठी देण्यात आल्या आहेत. या दरम्यान 14 लाख 34 हजार रुपये एवढा दंडही महापालिकेच्या किटकनाशक खात्याने वसूल केल्याचेही नारिंग्रेकर यांनी सांगितले आहे.

कुठे होते डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ?
गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधीत रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ‘एडिस एजिप्ती’ डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणूवाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभीवंत झाडे, घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली लावलेल्या झाडांच्या कुंड्या, अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर )डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात साठलेल्या स्वच्छ पाण्यात देखील या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.

मलेरियाच्या डासांची उत्पत्ती इथे होते -
मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणाऱ्या ‘एनॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. मात्र या प्रकारच्या डासांची उत्पत्तीस्थळे ही काही प्रमाणात वेगळी आहेत. जसे की विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलींग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी आदी ठिकाणी ही उत्पत्ती होते.

कशी घ्याल डासांपासून काळजी ?
घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुूमध्ये पावसाचे पाणी साचते व या स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या किटकनाशक खात्याने केले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.