मराठी शाळांच्या बचावासाठी 'सेल्फी विथ माय मराठी शाळा'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मराठी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, हा समज दूर करण्यासाठी आणि मराठी शाळांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी, यासाठी फेसबुकवर 'सेल्फी विथ माय मराठी शाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठी शाळा पडल्या बंद 

इंग्रजीमध्ये शिक्षण घेतल्यानं नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. उच्च शिक्षणात कोणत्याही अडचणी येत नाहीत, अशा अनेक समजुतीमुळे प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचं शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच करण्याच्या हट्टात, असतात. या हट्टापायी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या मराठी शाळांची पटसंख्या कमी झाली असून पटसंख्येअभावी अनेक शाळाही बंद पडल्या आहेत.

फेसबुक ग्रुप सुरू

मराठी शाळांची ही अवस्था बदलावी, मराठी शाळा टिकाव्या यासाठी साडेचार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद गोखले या पालकानं पुढाकार घेत 'मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत' हा फेसबुक ग्रुप सुरू केला. या ग्रुपद्वारे त्यांनी पालकांमध्ये मराठी शाळांविषयी जागरुकता निर्माण करण्यास सुरुवात केली.

'यांनी' केला उपक्रम सुरू

बऱ्याच मुलांना इंग्रजी विषय आत्मसात होण्यास लागणारा उशीर, अभ्यासाचा ताण, मुलांची दगदग, खेळासाठी न मिळणारा वेळ या सर्व गोष्टीमुळं अनेकांनी मराठी भाषा आणि मराठी शाळांकडे आपला मोर्चा वळवला. अनेक पालक या ग्रुपला भेट देऊन आपल्या परिसरातील मराठी शाळांबाबत विचारणा करू लागले. ही बाब लक्षात घेऊन प्रसाद गोखले यांनी ग्रुपच्या माध्यमातून 'सेल्फी विथ माय मराठी शाळा' हा उपक्रम सुरू केला.

या उपक्रमांतर्गत ग्रुपचे सर्व सदस्य, पालकांना त्यांचं शिक्षण झालेली मराठी शाळा आणि त्यांची मुलं शिकत असलेल्या मराठी शाळेसोबत सेल्फी काढून ग्रुपवर टाकण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला राज्यातून अनेकांनी प्रतिसाद दिला असून अनेक शिक्षक, पालक व तरुणांनी आपल्या शाळेसोबत सेल्फी काढून ग्रुपवर टाकले.

उपक्रम लोकप्रिय

मुंबई, ठाणे, कोकण, अहमदनगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, बुलढाणा, पुणे येथील पालकांनी या ग्रुपवर आपले सेल्फी किंवा शाळेचे फोटो अपलोड केले आहेत. त्यामुळं सध्या 'सेल्फी विथ माय मराठी शाळा' उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.

या उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या परिसरातील शाळा, त्यातील उपक्रम, शिक्षणाचा दर्जा यासदंर्भात माहिती मिळण्यास मदत होत असल्याचं गोखले यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

महापालिका शाळांचा कायापालट, पण पटसंख्या वाढेल का?

खोटी माहिती देणाऱ्या शाळांविरोधात आता होईल कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या