जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवर आता कारवाई होणार!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वांद्रे पूर्व भागात रेल्वे टर्मिनस मार्गावर मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा जलवाहिनी फुटल्यामुळे दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जलवाहिनीलगत असलेल्या धारावी, भांडुप, घाटकोपर, मरोळ, मुलुंड आदी भागांमधील झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून वांद्रयातील या झोपड्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात होती. परंतु, आता या दुघर्टनेनंतर येथील जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून ऑक्टोबरपासून तानसा जलवाहिनी झोपड्यामुक्त करण्यात येणार आहे.

कारवाई न झाल्यामुळेच घडली दुर्घटना

तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर परिसरातील झोपड्या हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जलवाहिनींना बसलेला झोपड्यांचा विळखा सोडण्यात महापालिकेला यश आले नाही. महापालिकेच्या एच पूर्व भागात वांद्रे पूर्व टर्मिनस परिसरपासून ते खार पूर्व आणि सांताक्रुझ परिसरातून जलवाहिनी जात असून या भागातील जलवाहिनींशेजारील एकाही झोपडीवर कारवाई करण्यात आलेली नाही. या झोपड्यांवर कारवाई न झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी बेहरामपाडा व नवपाडा मधील भागात जलवाहिनी फुटून लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तसेच दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

का रखडली होती वांद्र्यातील ही कारवाई?

एच पूर्व भागात जलवाहिनीलगत १० मीटर परिसरात बाधित होणाऱ्या कुटुंबांची संख्या २ हजार आहे. परंतु, यामध्ये २००० पर्यंतच्या पात्र कुटुंबांची संख्या ही केवळ ६०० ते ७०० एवढीच आहे. मात्र, मागील चार ते पाच वर्षांपासून या मुस्लिम बहुल वस्तीमध्ये शिरण्याची कोणाची हिंमत नसल्यामुळे अॅनेक्स्चरच होऊ शकलेला नाही. परिणामी, पात्र व अपात्र कुटुंबांची संख्या निश्चित न झाल्यामुळे त्यांच्यावरील कारवाईला विलंब होत आहे. एच पूर्व विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेऊन या जलवाहिनीलगतच्या झोपड्यांचा सर्वे करुन आरखडा तयार केला होता. परंतु, ही कारवाई हाती घेण्यापूर्वीच त्यांची बदली के-पश्चिम विभागात करण्यात आली.


पावसामुळे तूर्तास कारवाई नाही

या संपूर्ण विभागात दोन हजार झोपड्या जलवाहिनींवर आहेत. या सर्वांचा सर्वे झालेला असून पात्र व अपात्रांची यादी तयार केली जात आहे. यामध्ये काही अपात्र कुटुंबे आपली कागदपत्रे सादर करत आहेत. त्यामुळे जी पात्र कुटुंबे आहे, त्यांचे पुनर्वसन करुन अपात्र कुटुंबांच्या झोपड्यांवरील कारवाई हाती घेतली जाईल. सध्या पावसाळा असल्यामुळे ही तोडक कारवाई करता येत नसली, तरी ऑक्टोबरपासून जलवाहिनीवरील सर्व झोपड्यांवर कारवाई केली जाईल, असे एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी स्पष्ट केले.


कच्च्या झोपड्यांवर होणार कारवाई

मात्र, याबरोबरच ज्या कच्च्या झोपड्या पदपथ व रेल्वेने बांधलेल्या भिंतींच्या आड आहेत, त्या सर्व अनधिकृत झोपड्यांवर त्वरीत कारवाई केली जाईल, असेही अलका ससाणे यांनी स्पष्ट केले.


नुकसान भरपाई देण्याची मागणी

वांद्रे येथील जलवाहिनी फुटून आठ वर्षीय मुलासह ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यामुळे या मृत्यू पावलेल्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक सहाय्य देण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसेच या भागातील अनेक घरांमध्ये जलवाहिनीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व घरांचा आपत्कालीन विभागाच्या वतीने सर्वे करुन त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी राजा यांनी केली आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून अशा प्रसंगी अधिकृत किंवा अनधिकृत हा निकष न लावता तसेच भेदभाव न करता ही मदत दिली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. दरड कोसळल्यानंतर, तसेच झाड पडून दुघर्टना झाल्यानंतर ज्याप्रमाणे आर्थिक सहाय दिले जाते, त्याच धर्तीवर ही नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


जलवाहिनीवरील झोपड्या हटवण्याची डेडलाईन ३० जून २०१८

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींवरील झोपडया हटवण्यात महापालिकेला अपयश आले असून, आता ही कारवाई ३० जून २०१८ पर्यंत हटविली जाणार असल्याची ग्वाही खुद्द महापालिकेने न्यायालयात दिली आहे. सध्या कारवाईचा दुसरा टप्पा सुरु आहे. तर, चौथ्या टप्प्यातील कारवाई ३१ ऑक्टोबर २०१७पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले असून त्यापूर्वी ९ ऑक्टोबरपर्यंत या कारवाईचा अहवाल न्यायालयाला सादर करावा लागणार अाहे.


जलवाहिनी फुटली नसून फोडली

तानसा जलवाहिनी ही ८० ते ९० वर्षे जुनी आहे. परंतु, यावर झोपड्या असतानाही त्यावर कारवाई झालेली नाही. परंतु, या झोपड्यांमधील लोकांकडून जलवाहिनी फोडण्याचा प्रयत्न होत असे. त्यामुळे याच कारणामुळे ही शुक्रवारची घटना घडली असून जलवाहिनी फुटली नसून ती फोडली गेली असावी, असा आरोप माजी नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर यांनी केला आहे.

या भागांमधील जलवाहिनींवरील झोपड्यांवर झाली कारवाई

  • धारावी
  • भांडुप
  • मुलुंड
  • विद्याविहार
  • घाटकोपर
  • मरोळ

संभाव्य होणारी कारवाई

  • वांद्रे 
  • खार 
  • सांताक्रुझ


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या