Advertisement

घाटकोपरच्या जलवाहिनीजवळील झोपड्या हटविण्यास सुरूवात


घाटकोपरच्या जलवाहिनीजवळील झोपड्या हटविण्यास सुरूवात
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या 10 मीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या 'एन' विभागाने घाटकोपर पश्चिमेकडील कातोडी पाडा, आंबेडकर नगर, पंचशील नगर, सेवा नगर, जय मल्हार नगर तसेच विद्याविहार आणि भटवाडी येथील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे.

'डक लाईन' पुन्हा सुरू करण्याची महापालिकेची योजना -
उच्च न्यायालयाने बंद असलेल्या 'डक लाईन' जवळील अतिक्रमणे हटविण्याचेही महापालिकेला आदेश दिले आहेत. कातोडी पाड्यातील एकूण 408 घरे 'डक लाईन' वर वसलेली असल्याने ही घरे देखील तोडण्यात येत आहेत. बंद असलेली 'डक लाईन' भविष्यात पुन्हा सुरू करुन उर्वरित विभागाला त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याची महापालिकेची योजना आहे. त्यामुळे या 'डक लाईन'वरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे 'डक लाईन'?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेत येथे एक भुयारी मार्ग होता. ब्रिटीशांच्या कालावधीत या भुयारी मार्गातून पाणी सोडले जात होते. हा भुयारी मार्ग जवळपास 1956 ते 58 च्या कालावधीपर्यत सुरू होता. सद्यस्थितीत हा भुयारी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या भुयारी मार्गाचे बांधकाम दगडी असल्यामुळे त्याला 'डक लाईन' नावाने ओळखले जाते. उच्च न्यायालयाने 2007 साली तानसा जलवाहिनीच्या 10 मीटर परिसरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यास महापालिकेला सांगितले होते. तेव्हा कातोडी पाड्यातील बहुतांश घरे 'डक लाईन'वर उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या 'डक लाईन'वर राहणाऱ्या रहिवाशांचे माहुल येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2009 मध्ये कातोडी पाडा येथील रहिवाशांना पालिकेच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली होती. तेव्हा स्थानिक रहिवासी आणि माजी नगरसेविका यांनी मोर्चा काढल्यानंतर 'एन' विभागातील अधिकाऱ्यांनी कातोडी पाडा येथे चुकून सर्वेक्षण केल्याचे सांगितले होते, अशी माहिती स्थानिक रहिवासी मारुती साळसकर यांनी दिली.

उच्च न्यायालयाने तानसा जलवाहिनीच्या 10 मीटर जवळपासच्या अतिक्रमणांसोबतच बंद जलवाहिनीजवळील अतिक्रमणे हटविण्याचेही आदेश दिले आहेत. कारण येथील बंद जलवाहिन्या लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे 'एन' विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले.

सध्या बंद असलेल्या जलवाहिन्या सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला असला, तरी येथील अतिक्रमणे हटविल्यानंतर या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने कोणती काळजी घेण्यात येणार आहे? असा प्रश्न शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा