Advertisement

वांद्र्यात पाईपलाईन फुटल्याने 2 मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू


SHARES

वांद्रे टर्मिनसजवळ शुक्रवारी 72 इंचाची पाईपलाईन फुटल्याने दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनसजवळ बेहरामपाडाच्या मागे 1800 मिमी व्यासाची अर्थात 72 इंचाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनी मोठी असल्यामुळे पाणी रस्त्यावर पसरुन आसपासच्या झोपड्यांमध्ये शिरले. त्यामुळे दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये एका आठ महिन्याच्या बाळाचा आणि 9 वर्षांच्या मुलीचा समावेश असून विग्नेश डोईफोडे आणि प्रियांका डोईफोडे अशी त्यांची नावे आहेत.


जलवाहिनी मोठी असल्यामुळे पाणी रस्त्यावर पसरुन लोकांच्या घरात शिरले. दरम्यान, व्हॉल्व बंद करण्यात आले असून पाणी ओसरल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.


-रमेश बांबळे, उपायुक्त


आधीच पाणीकपात

मरोळ-रुपारेल टनेलला जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे फुटलेल्या जलवाहिनीचे काम सुरु असताना नवी पाणीकपात मुंबईकरांवर लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, पालिकेने युद्धपातळीवर हे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.


10 कोटी लिटर पाण्याची नासाडी

जलवाहिनी फुटल्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 10 ते 15 कोटी लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा अंदाज आहे. मुंबईला दरदिवशी 375 कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तानसा तलावातून शुद्धीकरण केलेले पाणी या जलवाहिनीतून मुंबईला आणून पुढे इतर जलशयांमध्ये जमा केले जाते. तानसा जलवाहिनीतून शहर भागातील अनेक परिसरात थेट पाणीपुरवठाही केला जातो. त्यामुळे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. सध्या ज्या भागांमध्ये पाणीकपात आहे, त्या ठिकाणी शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पाणीपुरवठा 100 टक्के होऊ शकणार नाही, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.




हेही वाचा

प्रतिक्षानगरमध्ये 10 महिन्यांपासून होतेय पाणी गळती!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा