शिवाजी पार्क लायन्स फायनलमध्ये, आता झुंज ट्रम्प नाइट्सशी

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

सोबो सुपरसोनिक्ससमोर फायनलमध्ये प्रवेश मारण्याची दुसरी संधी…अभिषेक नायर आणि आरक्षित गोमेल यांच्या अर्धशतकी खेळीनंतर सुपरसोनिक्सने उभारलेला ७ बाद १९४ धावांचा डोंगर… त्यामुळे अंतिम फेरीच्या पल्लवित झालेल्या आशा… शिवाजी पार्क लायन्सच्या फलंदाजांवर आलेलं दडपण… पॉल वल्थाटी आणि ब्रविश शेट्टी यांनी विजयासाठी केलेली पायाभरणी… अल्पेश रामजानी आणि हार्दिक तामोरे यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली जबाबदारी… अखेर चौथ्या विकेटसाठी रामजानी आणि तामोरे यांनी केलेली ९० धावांची भागीदारी… रामजानीने ठोकलेले अर्धशतक याच्या बळावर शिवाजी पार्क लायन्सने सोबो सुपरसोनिक्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) आयोजित पहिल्यावहिल्या टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या फायनलमध्ये ट्रम्प नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट आणि शिवाजी पार्क लायन्स हे विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजतील.

नायर-गोमेलची शतकी भागीदारी

प्रथम फलंदाजी करताना सोबो सुपरसोनिक्सला दुसऱ्याच षटकांत पहिला हादरा बसला. रॉयस्टन डायसने जय बिश्तचा (६) त्रिफळा उडवत शिवाजी पार्कला पहिलं यश मिळवून दिलं. पण सलामीला उतरलेला कर्णधार अभिषेक नायर आणि आरक्षित गोमेल यांनी सुपसोनिक्सचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली. प्रतिषटकामागे तब्बल १० धावांच्या सरासरीने धावा कुटत या दोघांनी शिवाजी पार्कच्या गोलंदाजांची कत्तल केली. अखेर शम्स मुलानीने आपल्याच गोलंदाजीवर अभिषेक नायरला झेलबाद करत ही जोडी फोडली. नायर ३३ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा काढून माघारी परतला. त्यापाठोपाठ आरक्षित गोमेलनेही तनुष कोटियनच्या गोलंदाजीवर झेल देऊन पॅव्हेलियनची वाट धरली. त्याची खेळी ८ चौकारांसह ५१ धावांवर संपुष्टात आली. तळाच्या रोहन राजेने ११ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत नाबाद २६ धावा फटकावल्यामुळे सोबो सुपरसोनिक्सला २० षटकांत ७ बाद १९४ धावांपर्यंत झेप घेता आली.

अल्पेश रामजानीचे सुयश

सोबो सुपरसोनिक्सने विजयासाठी ठेवलेले १९५ धावांचे अशक्यप्राय आव्हान गाठताना पॉल वल्थाटी (४१) आणि सिद्धार्थ आक्रे (१४) यांनी शिवाजी पार्कला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर वल्थाटी आणि ब्रविश शेट्टी (३४) यांनी डावाचा मोर्चा सांभाळत सरासरी राखून धावांची गती वाढवली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भर घातली. मात्र सहा चेंडूंच्या फरकाने दोघेही माघारी परतल्यामुळे शिवाजी पार्कची अवस्था बिकट झाली होती. ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत सामना येऊन ठेपला असताना अल्पेश रामजानी आणि हार्दिक तामोरे शिवाजी पार्कच्या मदतीला धावून आले. या दोघांनी तुफानी फटकेबाजी करून शिवाजी पार्कला अडचणीतून बाहेर काढले आणि विजयासमीपही आणून ठेवले. रामजानी-तामोरे यांनी चौथ्या विकेटसाठी ९० धावांची मोलाची भागीदारी रचली. त्यामुळे शिवाजी पार्कने १३ चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय साकारला. रामजानीने ३४ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद ६४ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याला चांगली साथ देताना तामोरेने ३२ धावांचे योगदान दिले.


हेही वाचा - 

शिवाजी पार्क लायन्सची फायनलकडे वाटचाल

ट्रम्प नाइट्सची टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक

पुढील बातमी
इतर बातम्या