Advertisement

सोबो सुपरसोनिक्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये सलग दुसरा विजय


सोबो सुपरसोनिक्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये सलग दुसरा विजय
SHARES

सोबो सुपरसोनिक्सने वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रंगलेल्या टी-२० मुंबई लीगमधील सामन्यात नमो वांद्रे ब्लास्टर्सचा ५० धावांनी पाडाव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. अंधुक प्रकाश अाणि पावसाच्या हलक्या सरींमुळे हा सामना १८ षटकांचा खेळवण्यात अाला. प्रसाद पवारच्या अर्धशतकी खेळीमुळे सोबो सुपरसोनिक्सने ६ बाद १४९ धावा उभारल्या. मात्र हे अाव्हान पार करताना अभिषेक नायर, रोहन राजे अाणि जय बिश्त यांच्या गोलंदाजीसमोर नमो वांद्रे ब्लास्टर्सच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. त्यामुळे त्यांना १८ षटकांत ९ बाद ९९ धावांपर्यंतच मजल मारता अाली. नमो वांद्रे ब्लास्टर्सचा हा पहिला पराभव ठरला. याअाधी त्यांनी दोन्ही सामन्यांत विजय मिळवला होता.


प्रसाद पवारचे दमदार अर्धशतक

प्रथम फलंदाजी करताना सोबो सुपरसोनिक्सला सुरुवातीलाच दोन हादरे बसल्यानंतर प्रसाद पवार अाणि अारक्षित गोमेल यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. गोमेल ३१ धावा काढून माघारी परतल्यानंतर प्रसादने तुफान फटकेबाजी केली. त्याने ५३ चेंडूंत ६ चौकार अाणि ३ षटकारांनिशी ८३ धावा कुटल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी सुजित नायकसह ६७ धावांची भर घातली. त्यामुळे सोबो सुपरसोनिक्सला १८ षटकांत ६ बाद १४९ धावा करता अाल्या.


ब्लास्टर्सची सुरुवातच निराशाजनक

सोबो सुपरसोनिक्सचे १५० धावांचे अाव्हान पार करताना नमो वांद्रे ब्लास्टर्सची सुरुवातच खराब झाली. अभिषेक नायर अाणि रोहन राजे यांनी वांद्रे ब्लास्टर्सला हादरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर वांद्रे ब्लास्टर्स संघ सावरलाच नाही. गेल्या दोन्ही सामन्यातील अर्धशतकवीर-कर्णधार श्रेयस अय्यर मैदानावर उभा राहिला तरी त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. श्रेयस २५ धावा काढून माघारी परतल्यानंतर नमो वांद्रे ब्लास्टर्सचा पराभव निश्चित झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा