दहावी पेपरफुटी प्रकरण: चौथ्या आरोपीला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

दहावीच्या पेपरफुटी प्रकरणी अंबोली पोलिसांनी ३१ वर्षांच्या शिक्षकाला अटक केली. रोहित अमुलराज सिंग असं या शिक्षकाचं नाव असून ज्या 'ब्रिलियंट क्लास'मधून हा पेपर फुटला त्यामध्ये रोहित शिकवतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी फिरोज खान याने व्हाॅट्स अॅपद्वारे पाठवलेले पेपर रोहितने त्याच्या विद्यार्थ्यांना पाठवले होते.

असा 'फोडला' पेपर

बदलापूर परिसरात राहणाऱ्या फिरोज खानला मुंब्रातील किड्स पॅराडाईज शाळेने दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षणासाठी पाठवलं होतं. त्यावेळी इतर शिक्षकांच्या न कळत फिरोजने संबधित पेपरचे फोटो काढून ते व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून रोहितला पाठवल्याची कबुली फिरोजने दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

'अशी' घेतली उजळणी

फिरोजने या पूर्वी देखील २०१३ मध्ये पेपर फोडला असून त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शाळेत शिकवण्यासोबत फिरोज ५ विविध क्लासमध्ये शिकवणी घेण्यासाठी जायचा. फिरोजने पेपर होण्यापूर्वीच बीजगणित, भूमिती, विज्ञान १, विज्ञान २, आणि समाजशास्त्राच्या पेपरची प्रश्नपत्रिका मिळवून त्याआधारे मुलांची उजळणी घेतल्याचं तपासात पुढं आलं आहे.

त्यामुळे पूर्वी पेपरफुटीच्या गुन्ह्यांची नोंद असताना त्या शाळेने फिरोजला अद्याप कामावर का ठेवल? तसंच त्याला दहावीच्या परीक्षा केंद्रावर का पाठवलं? याचा पोलिस शोध घेत आहेत.


हेही वाचा-

पेपरफुटीचं खापर फक्त कोचिंग क्लासवर का?

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या