Advertisement

पेपरफुटीचं खापर फक्त कोचिंग क्लासवर का?

पेपरफुटीच्या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या खासगी कोचिंग क्लासवर सरकारने जरूर कारवाई करावी. पण सरसकट सर्वच कोचिंग क्लासला चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये, असं महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कर्णावत म्हणाले.

पेपरफुटीचं खापर फक्त कोचिंग क्लासवर का?
SHARES

दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीत खासगी कोचिंग क्लासचा समावेश आढळून आल्यास संबधित कोचिंग क्लासला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशा प्रकारचं आश्वासन विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं. मात्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीचं खापर फक्त खासगी कोचिंग क्लासवर कशासाठी फोडण्यात येत अाहे, असा प्रश्न विचारत खासगी कोचिंग क्लास चालवणाऱ्यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचं ठरवलं आहे.


पेपरफुटीला कोण जबाबदार?

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत ही प्रश्नपत्रिका उल्हासनगरमधील एका खासगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या शिक्षिकेने पाठविल्याची कबुली विद्यार्थ्यांनी दिली होती. पण या शिक्षिकेकडे ही प्रश्नपत्रिका कशी आली?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यापूर्वी बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. त्या वेळीही या पेपरफुटीत खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षकांचा संबंध असल्याची चर्चा होती.


उगास त्रास कशाला?

पेपरफुटीच्या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या खासगी कोचिंग क्लासवर सरकारने जरूर कारवाई करावी. पण सरसकट सर्वच कोचिंग क्लासला चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये, असं महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कर्णावत म्हणाले.

पेपरफुटीच्या प्रकरणात अडकलेली शिक्षिका एका काॅलेजमधील प्राचार्य असल्याचंही कळत अाहे. काॅलेज किंवा शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना खासगी कोचिंग क्लास चालविण्याची किंवा तिथं काम करण्याची परवानगी नसताना या नियमाचं उल्लंघन होतंच कस? त्यावर सरकारचा वचक नाही का? असा प्रश्नही कर्णावत यांनी उपस्थित केला.


कर्मचाऱ्यांचा सहभाग किती?

गेल्या वर्षी पेपरफुटीची ७ प्रकरणे होण्याआधीच खाजगी कोचिंग क्लास चालकांनी हे प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यासाठी कौतुक करण्याऐवजी क्लास चालकांना चौकशीला सामोरं जावं लागलं.

कुठलीही प्रश्नपत्रिका शाळा/काॅलेजच्या हाती येण्याआधी ती शिक्षण मंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हाती येते. त्यामुळे पेपरफुटीच्या प्रकरणात सर्वात आधी शिक्षण मंडळाच्या आधिकारी-कर्मचाऱ्यांचा हात आहे का? याची शिक्षण विभागाने आधी चौकशी करायला हवी, अशी मागणीही खासगी कोचिंग क्लास चालकांनी केली.


लागेबांधे मोडीत काढा

खासगी कोचिंग क्लास आणि काॅलेज यांच्यातील लागेबांधे मोडीत काढण्यासाठी कायदाही आला. मात्र त्याची कडक अंमलबजावणी झाली नाही. शिक्षण विभाग अनेक निर्णय घेते. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. या सर्व प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे शिष्टमंडळ लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी घेतली.


शिक्षणाचा दर्जा सुधारा

शाळा आणि काॅलेजांमधील शिक्षणाचा दर्जा घसरल्याने असंख्य विद्यार्थ्यांना नाईलाजाने खासगी कोचिंग क्लासची वाट धरावी लागत आहे. याची दखल शिक्षण विभागाने घ्यावी आणि त्यानुसार शिक्षणसंस्थांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवावा.
शिवाय एखाद्या क्लासच्या चुकीमुळे संपूर्ण खासगी क्लासच्या संस्थाचालकांना चुकीचं ठरवण्यात येऊ नये.
- सचिन कर्णावत, अध्यक्ष, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन



हेही वाचा-

आझाद मैदान आंदोलनाला खासगी कोचिंग क्लासेसची फूस?

५ टक्के शैक्षणिक निधीचं ओझं मानगुटीवर कशाला? खासगी क्लास चालकांचा सरकारी मसुद्याला विरोध

मनमानी फी वाढवणाऱ्या शाळांवर कडक कारवाई-तावडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा