Advertisement

आझाद मैदान आंदोलनाला खासगी कोचिंग क्लासेसची फूस?


आझाद मैदान आंदोलनाला खासगी कोचिंग क्लासेसची फूस?
SHARES

एमपीएससी भरतीमधील गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो परीक्षार्थी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, 'या आंदोलनाला खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस आहे' असा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे, विरोधकांसोबतच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्येही नाराजी पसरली आहे.


बघा, काय म्हणाले मुख्यमंत्री?


 


भरती सुरू करण्याबाबत उपाययोजना

एमपीएससीची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असं स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. यावेळी निवेदन करताना आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला खाजगी क्लासेसवाल्यांची फूस असल्याचा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


दीड लाख रिक्त पदे, जाहिरात फक्त ६९ पदांसाठी!

विखे पाटील यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. लोकसेवा आयोगाच्या पदांची भरती होत नसल्यामुळे बेरोजगार तरूणांमध्ये प्रचंड असंतोष असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो तरूणांचा मोर्चा मुंबईला आला आहे. राज्यात सुमारे दीड लाख पदे रिक्त असताना एमपीएससीच्या माध्यमातून केवळ ६९ पदांची जाहिरात देण्यात आली. एकीकडे वर्षाला दोन कोटी नोकरभरतीची घोषणा केली जाते. तर दुसरीकडे शासकीय नोकरभरतीत ३० टक्के कपात करण्याचेही प्रस्तावित केले जाते, ही विसंगती असल्याची बाब विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.



मार्गदर्शन केंद्रांचं करायचं काय?

एमपीएससीत काही गैरव्यवहार होत असतील, तर ते दूर केले पाहिजेत. परंतु, त्यासाठी अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय करणे योग्य नसल्याचेही विखे पाटील म्हणाले. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, जर भरतीच होणार नसेल, तर या मार्गदर्शन केंद्रांचा काय उपयोग? अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली. सरकारने तातडीने भरती करून राज्यातील बेरोजगार तरूणांचा असंतोष कमी करावा. अन्यथा सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


आंदोलनात खासगी क्लासेसचेही लोकं?

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी भरती करण्याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल, असे सूतोवाच केले. आजच्या आंदोलनात तरुणांसोबतच खाजगी क्लासेसचे लोकही सहभागी होते, असा आरोप करताना मुंबईत झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याचा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मात्र आपण या संदर्भात लवकरच कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.



हेही वाचा

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुंबईत आक्रोश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा