हॉटेलात बिलासाठी एटीएम कार्ड द्याल तर खबरदार! तुमचाही असाच घात होईल!

हॉटेलात जाऊन मस्तपैकी पेटपूजा केल्यावर जेव्हा बिल भरायची वेळ येते, तेव्हा काही धनदांडगे वा बेफिकीर ग्राहक वेटरवर मेहरबान होत आपल्या डेबिट, क्रेडिट कार्डाचा पिन क्रमांक बिनधास्तपणे त्याला देऊन मोकळे होतात.

मग तेथूनच सुरू होतो आर्थिक फसवणुकीचा खेळ. हे वेटर दिसायला भलेही साधेभोळे असले, एखाद्याचे बँक खाते कुठल्याही क्षणी रिकामे करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते.


वेटरची टोळी गजाआड

हे सांगण्यामागचे कारण म्हणजे वांद्रे पोलिसांनी अशा प्रकारे ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अंधेरीतील मेट्रो बार अँड रेस्टॉरंट आणि वांद्र्यातील पर्शियन दरबार या हॉटेलमधील आठ वेटरच्या टोळीला गजाआड केले आहे.


अशी करायचे कार्डातील डेटा चोरी

ही वेटरची टोळी हॉटेलातील ग्राहकांनी स्वाईप करण्यासाठी दिलेले कार्ड 'स्कीमर मशीन'मध्ये टाकून कार्डातील डेटा चोरत आणि कार्डाचा पासवर्डलिहून ठेवत असत. त्यानंतर हा पासवर्ड टोळीचा म्होरक्या मुशर्रफ सय्यद (34) यांच्याकडे सोपवत.


हा होता टोळीचा म्होरक्या

मुशर्रफ स्कीमर मशीनद्वारे कार्डाचा डेटा बनावट कार्डावर छापून ग्राहकांच्या 'एटीएम' मधून पैसे काढत असे. आपल्या खात्यातून कुणी पैसे काढले आहेत, हे समजायच्या आधीच मुशर्रफ तेथून निसटायचा.


प्रत्येक स्वाईपमागे हजार रुपये

मुशर्रफ प्रत्येक स्वाईप मागे वेटरला 1 हजार रुपये द्यायचा. अशाप्रकारे प्रत्येक वेटर दर महिन्याला 40 ते 50 हजार कमावत.


असा सापडला जाळ्यात

अंधेरी आणि वांद्र्यातील एटीएममधून परस्पर पैसे काढण्याच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर पोलिसांनी काही एटीएमवर पाळत ठेवली. याचदरम्यान गेल्या आठवड्यात एक व्यक्ती मध्यरात्री वांद्र्यातील एटीएममधून पैसे काढत होती. त्याची चौकशी केल्यावर त्याच्याजवळ 2010 सालचे जुने एटीएम सापडले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले, ही व्यक्ती म्हणजेच मुशर्रफ.


दीड हजार जणांचा डेटा सापडला

मुशर्रफकडून मिळालेल्या ग्राहकांचा डेटा बघून पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. मुशर्रफकडे पोलिसांना तब्बल 90 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांच्या दीड हजार ग्राहकांचा डेटा सापडला आहे.


काय आहे स्कीमर मशीन ?

स्कीमर मशीन हातात लपवता येईल एवढी छोटी असते. या मशीनमध्ये एटीएम कार्ड घालताच किंवा स्वाईप करताच त्यातील सगळा मॅग्नेटिक डेटा स्कीमर मशीनमध्ये जमा होतो. त्यानंतर हाच डेटा दुसऱ्या एटीएम कार्डवर पुन्हा राईट करता येतो. विशेष म्हणजे एका स्कीमर मशीनमध्ये शेकडो कार्डाचा डेटा ठेवता येतो.


एटीएमचा वापर करताना...

सध्याचा जमाना ऑनलाईनचा आहे. आर्थिक देवाण-घेवाण करण्याच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात ऑनलाईनला पसंती दिली जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तर अनेकांनी जवळ रोकड बाळगणेही बंद केले आहे.

त्यामुळे डेबिट, क्रेडीट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण हे कार्ड वापरताना काहीजण अनावधानाने आपला गोपनीय पिन क्रमांक चोरांच्या हाती सोपवत असल्याने आर्थिक फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे.

खरे तर अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीला पिन क्रमांक देणेच चुकीचे आहे. पण हा क्रमांक दिलाच, तर हॉटेलबाहेर पडताच एटीएम गाठून त्वरीत पिन क्रमांक बदलणेही आवश्यक असते. पण तसे न झाल्यास आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.


काय करावे ?

  • वरचेवर एटीएम पिन बदला
  • स्वतःच्या बॅंकेचे एटीएम स्वत:च वापरा
  • एटीएममध्ये दुसरी व्यक्ती नसल्याचे पाहून घ्या
  • डेबिट कार्ड परदेशात वापरल्यास पिन तात्काळ बदला
  • कार्डासंबंधी विसंगती आढळल्यास सतर्क राहा
  • संशयास्पद फोन आल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा
  • रात्रीच्या वेळी एटीएम वापरताना सोबत असू द्या
  • संगणकातील अँटी व्हायरस अप- टू- डेट ठेवा
  • स्पायवेअर आणि मालवेअर डिटेक्शनचा वापर करा


काय टाळावे?

  • पासवर्डमध्ये बायको, मुलांच्या नावांचा उल्लेख टाळा
  • वाढदिवसाच्या तारखांचा उल्लेख टाळा
  • आर्थिक माहिती मागणारे ई-मेल्स उघडू नका
  • बँक खात्याची माहिती मॅसेज किंवा फोनवर देऊ नका
  • कोणत्याही दुकानदाराला कार्ड नंबर किना पिन देऊ नका
  • तुमच्या गैरहजेरीत कोणालाही कार्ड स्वाईप करण्यास देऊ नका
  • एटीएम कार्ड आणि पावती वेगळी ठेवा
  • पावती एटीएममध्ये सोडून जाऊ नका
  • पासवर्ड टाकताना कोणी बघत नसल्याची खात्री करा
  • एटीएमच्या लाईट्स बंद असल्यास वापर टाळा


हेही वाचा

एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी बल्गेरियन नागरिकाला अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या