बिग बॉस फेम हिना पांचाळच्या अडचणीत वाढ, ड्रग अँगलनं होणार चौकशी

इगतपुरी रेव्ह पार्टीत अटक झालेल्या बिग बॉस फेम हिना पांचाळला ड्रग्ज प्रकरणी कोर्टानं एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितलं की, वैद्यकीय अहवालाच्या आधारे एनडीपीएस कायद्याचा कोणता कलम त्यांना लागू होईल याचा निर्णय घेतला जाईल. ज्या लोकांना पोलिसांनी अटक केली ते ड्रग्ज सप्लायर आहेत की नाही, या अँगलनंही चौकशी केली जाणार आहे. हिना पांचाळ हिचीदेखील ती ड्रग्ज सिंडिकेटचा भाग आहे की नाही याची चौकशी केली जाईल.

आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरीमधील एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पाेलिसांनी शनिवारी रात्री २ वाजता छापा टाकला. काेराेना निर्बंधांचे काेणतेही नियम न पाळता आयाेजित या पार्टीत हिंदी तसंच तेलगू चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला आणि तरुण सहभागी होते.

त्यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ आणि अझार फारनूद या विदेशी महिलेसह दोन कोरिओग्राफरचाही समावेश आहे. नायजेरियन ड्रग माफियाच्या सहकार्यानं मुंबईमधील एका बड्या बुकीच्या वाढदिवसानिमित्त ही जंगी पार्टी देण्यात आली होती. हुक्का, कोकेन, हेरॉइनचा त्यात मुक्तहस्ते वापर सुरू हाेता.

याप्रकरणी पोलिसांनी १२ महिला आणि १० पुरुष अशा २२ जणांना अटक केली आहे. पाठाेपाठ मुंबईतून पाेलिसांनी नायजेरियन ड्रग माफियालादेखील अटक केली. त्यांची चाैकशी रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. 

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री छापा टाकला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या पीयूष नामक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरीच्या स्काय ताज व्हिला इथं मुंबई आणि पुण्यातील १० पुरुष आणि १२ महिलांची रेव्ह पार्टी आयाेजित करण्यात आली हाेती. २७ जूनला रात्री बारा वाजता वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

हिना पांचाळ हिनं हिंदी, तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीत अल्पवधीतच नाव कमावलं आहे. हिना पांचाळ हिच्या नावावर जास्त चित्रपट नाहीत. मात्र, आयटम डान्सर म्हणून तिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ‍हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन सारख्या आयटम साँगमध्ये हिना थिरकताना दिसली.

याशिवाय बलम बंबई आणि बेवडा बेवडा जालो मी टाइट या गाण्यांसाठी ती लोकप्रिय आहे. २०१९ मध्ये बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात हिना सहभागी झाली होती. मात्र अंतिम फेरीत ती धडक मारु शकली नव्हती. फेब्रुवारी २०२० मध्ये मुझसे शादी करोगे या डेटिंग रिअॅलिटी शोमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.


हेही वाचा

एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप

पुढील बातमी
इतर बातम्या