मुंबईत गुरुवारी दुपारी पडलेल्या जोरदार पावसाने विक्रोळी पार्कसाईट परिसरातील नाला तुडूंब भरून वाहू लागला. या नाल्यातील पाण्याचा जोर इतका होता की पार्कसाईट येथे राहणारे दोघे भाऊ नाल्यात वाहून गेले. या दुर्घटनेत एकजण बचावला असून दुसरा अजूनही बेपत्ता आहे. अग्निशमन दलाचे जवान या बेपत्ता तरूणाचा कसून शोध घेत आहेत.
1100 कोटी खर्च करूनही ‘मिठी’चा नालाच!
सलमान कुरेशी (25) आणि सोनू कुरेशी हे दोन्ही भाऊ विक्रोळीतल्या पार्कसाईट येथील लग्नसराय विभागात राहतात. पार्कसाईट परिसरातील घरातल्या नळाला पाणी येत नसल्याने हे दोघेही पाईपलाईन दुरूस्तीच्या कामासाठी तेथील नाल्यात उतरले. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू झाला आणि पार्कसाईटच्या डोंगरावरून पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यात हे दोघे वाहू लागले. सलमान कुरेशी हा पाण्यातून वर आला. पण त्याचा लहान भाऊ सोनू वाहून गेला. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशामक दलाला दिली. सध्या पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान वाहून गेलेल्या सोनू कुरेशी याचा शोध घेत आहेत.
हा नाला मोठा असून तो काही भागातून भूमिगत आहे. विक्रोळीतून पुढे खाडीला जाऊन मिळतो. संध्याकाळपर्यंत वाहून गेलेल्या सोनूचा अजूनही शोध लागलेला नाही.