SHARE

26 जुलैच्या पावासात मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मिठी नदीचा विकास आजही रखडलेलाच आहे. दोन वेळा मुदत वाढवल्यानंतर हे काम एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाला अद्यापही मिठी नदीच्या विकासाचा पल्ला गाठता आलेला नाही. आतापर्यंत मिठी नदीच्या विकासावर तब्बल 1100 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चूनही मिठी नदीचे रुपडे पालटलेले नाही. मिठी नदी आजही नाल्यासारखीच असून दहा वर्षांत मिठी नदीच्या नाल्याचे नदीत रुपांतर झालेले नाही.

संपूर्ण मुंबईमध्ये 17.8 किलोमीटर लांबीची मिठी नदी पसरली आहे. या मिठी नदीचा विहार तलाव ते सीएसटी पूलदरम्यान 11.8 किलोमीटरचा भाग महापालिकेकडे तर सीएसटी पूल ते माहीम कॉजवे असा 6 किलोमीटरचा परिसर एमएमआरडीएकडे तसेच वाकोला नाल्याचा भाग येतो. मिठी नदीच्या प्रकोपानंतर राज्य सरकारने मिठी नदी क्षेत्रीय विकास प्राधिकरणाची स्थापना केली. मिठीची साफसफाई, विकास कामाची जबाबदारी एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाकडे दिली असून त्यास केंद्र सरकारने निधी देण्याचे ठरले होते. महापालिकेच्या हद्दीतील खोलीकरण आणि रुंदीकरणाचे 95 टक्के काम पूर्ण झाले. पण पहिल्या टप्प्यासाठी 28.97 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 573.89 कोटी रुपये एवढे महापालिकेच्या वतीने खर्च करण्यात आले आहेत.

मिठी नदीच्या संपूर्ण कामासाठी 1239.60 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. त्यानुसार हा प्रकल्प डिसेंबर 2012 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु डिसेंबर 2012 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी हा प्रकल्प एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण होईल, असे जाहीर केले होते. परंतु एप्रिल 2017 उलटून 2 महिने झाले तरीही मिठी नदीच्या विकासाचा अंतिम टप्पा महापालिकेला गाठता आलेला नाही. महापालिकेच्या हद्दीतील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील कलिना भागातील एक किलोमीटरचा परिसर अतिक्रमित आहे. या ठिकाणी सुमारे 1500 पात्र, अपात्र बांधकामे असून त्यातील 500 निवासी आणि उर्वरीत व्यावसायिक गाळे आहेत. या बांधकामांबाबत न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथील 1500 अतिक्रमित बांधकामे जर आपल्याला मोकळी करून दिली तर मिठी नदीचे संपूर्ण काम आपण करून देऊ, असे पर्जन्य जल विभागाचे प्रमुख अभियंता आणि संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत मिठी नदीसाठी महापालिकेने 625 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याप्रमाणे 95 टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा व्हटकर यांनी केला आहे. या 625 पैकी 325 कोटी रुपये मिठी नदीवरील पुलांच्या बांधकामांवर खर्च केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत सेवा रस्ता हा 1960 मीटर इतका बांधला गेला असून 10,467 मीटर इतके काम शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा - 

आधी मिठी नदीची पाहणी, नंतरच प्रस्तावाला मंजुरी


एमएमआरडीएच्या वतीने 467 कोटींचा खर्च

एमएमआरडीएच्या वतीने मिठी नदीच्या कामासाठी पहिल्या टप्प्यासाठी 34.50 कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी 419.92 कोटी रुपये अशा प्रकारे एकूण 467.51 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या वतीने रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले असले, तरी नदी शेजारील सेवा रस्त्यांचे काम आजही काही प्रमाणात प्रलंबितच आहे.

रुंदीकरण तरीही प्रदूषितच

मिठी नदीच्या रुंदीकरणाचे तसेच खोलीकरणाचे काम 90 ते 95 टक्के पूर्ण झाल्यानंतरही मिठी प्रदूषितच आहे. या नदीमध्ये जाणारे मलनि:सारण वाहिन्यांचे पाणी तसेच सांडपाणी बंद करण्यात आलेले नाही. तसेच लोकांकडून आजही या मिठी नदीत कचरा आणि टाकाऊ वस्तू फेकल्या जात आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या