SHARE

नालेसफाईच्या कंत्राट कामांमधील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर नालेसफाईचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यापूर्वी त्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्धार सत्ताधारी शिवसेनेने केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत मिठी नदीच्या साफसफाईचा प्रस्ताव मंजुरीला आला असता आधी या मिठी नदीची पाहणी करण्याची मागणी सभागृहनेत्यांनी करत हा प्रस्ताव तहकूब करण्याची मागणी केली. परंतु हा प्रस्ताव तहकूब करण्याऐवजी तो दप्तरी दाखल करण्याची मागणी काँग्रेससह भाजपाने केली. परंतु शिवसेनेच्या तहकुबीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही पाठिंबा दिल्यामुळे बहुमताच्या आधारे मिठी नदीचा प्रस्ताव तहकूब करण्याचा निर्णय स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी घेतला.

सन 2017-18 या वर्षांकरिता मध्यवर्ती यंत्रणेमार्फत एच/पूर्व विभागातील मिठी नदीतील चेनेज 1280 मीटरपासून चेनेजर 3500 मीटर म्हणजेच धारावी पुलापासून प्रेमनगर आऊटफॉलपर्यंत गाळ काढण्यासाठी एस.एन.बी.इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आले आहे. या कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा 13.50 टक्के कमी दराने बोली लावून 3 कोटी 86 लाख 16 हजार कोटींचे कंत्राट मिळवले. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृह नेते यशवंत जाधव यांनी हा विषय तहकूब करण्याची मागणी केली. कंत्राट कामांमध्ये 1600 रुपयांचा भाव लावलेला असून, व्हीटीएस प्रणाली ही महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाशी जोडली गेलेली नसून, या मिठी नदीची पाहणी करूनच हा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली.

यावर भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाल्यातील गाळाची विल्हेवाट ज्या आडवली भूतवली आदी भागांमध्ये करण्यात आली आहे, त्याची पाहणी केली. परंतु याचा अहवाल अद्यापही प्रशासनाने दिलेला नाही. पाहणीसाठी अधिकारी येत नाही. त्यामुळे जोपर्यंत असे अहवाल दिले जात नाहीत, तोपर्यंत संबंधित प्रस्ताव मंजूर करू नयेत,अशी सूचना शिंदे यांनी केली. तर मनोज कोटक यांनी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करत नाल्यातील हा गाळ ज्या गावांमध्ये खासगी जागेत टाकला जातो, तेथील पर्यावरण दुषित केले जात आहे. त्यामुळे गावांसाठी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून घातक असल्यामुळे गाळाचे विल्हेवाट लावणारे हे प्रस्ताव रद्द करण्यात यावेत,अशी मागणी कोटक यांनी केली. तसेच एसएनबी अर्थात श्याम नारायण ब्रदर्स या कंपनीला एमएमआरडीएने काळ्या यादीत टाकले आहे, मग महापालिकेने त्याला काम का द्यावे, असा सवाल त्यांनी केला.

मनसेचे दिलीप लांडे यांनी ही कंपनी याठिकाणी आधी ड्रेब्रीज टाकते आणि पाऊस पडल्यानंतर तेच ड्रेब्रीज उचलते,असे सांगितले. काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनीही पर्यावरणाचा विचार करता हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. पर्यावरणाची मंजुरी न घेता टाकल्या जाणाऱ्या या गाळाचे प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणीही सपाचे रईस शेख यांनी करत झकेरियांना पाठिंबा दिला. मात्र, प्रशासन स्थायी समितीला गंभीर घेत नसल्याचा आरोप करत विरोध पक्षनेते रवी राजा यांनी नालेसफाईच्या घोटाळ्यातील कारवाई करण्यात आलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांबाबतच्या पुढील कार्यवाहीबाबतचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्याची मागणी केली. त्यामुळे या मिठी नदीची प्रत्यक्ष पाहणी करूनच योग्य तो निर्णय घेतला जावा. ऐन पावसाळ्यात नालेसफाई न झाल्यामुळे स्थानिकांना याचा त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जावी,अशीही सूचना राजा यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी घाटकोपरमधील लक्ष्मीबाग नाल्यातील सफाई त्वरीत केली जावी आणि तुटलेल्या संरक्षक भितींची दुरुस्ती केली जावी,अशी सूचना करत पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जावी,अशी मागणी केली.

त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी तहकुबी मतास टाकली. यामध्ये शिवसेनेने मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या जोरावर बहुमताच्या आधारे तहकूबी मंजुरी केली. त्यांना 11 मते मिळाली तर भाजपासह काँग्रेस यांना 9 मते मिळाली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या