'भाई की बोली सून, नहीं तो गोली मिलेगी' - इक्बाल

इक्बाल कासकर आपला भाऊ अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या नावानं मुंबई, ठाण्यातील बिल्डरांना कशा प्रकारे धमकावत होता याचे अनेक नमुने पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहेत. 'भाई की बोली सून, नहीं तो गोली मिलेगी' अशी धमकी देऊन इक्बालनं आपल्याला चांगलंच सतावल्याचं एका बिल्डरने पोलिसांना सांगितलं आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बिल्डर तसेच धनाड्य ज्वेलर्सना इक्बाल दाऊदच्या नावाने धमकवायचा आणि मागितलेली खंडणी न दिल्यास खंडणीची रक्कम दुप्पट करायचा, असं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे.

सोमवारी बेड्या ठोकलेल्या इक्बाल कासकर विरोधात ठाणे पोलिसांनी आणखीन एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या ठाणे खंडणी विरोधी शाखेसह गुप्तहेर शाखा (inteligence bureau) देखील इक्बालची चौकशी करत आहेत. चौकशीत इक्बालच्या आणखीन ४ साथीदारांची नावे समोर आली असून ठाणे खंडणीविरोधी पथक त्यांचा शोध घेत आहे.

इक्बालचं नाशिक कनेक्शन

इक्बाल ठाणे आणि नाशिकच्या सतत दौऱ्यावर असायचा. इक्बालच्या बहिणीचा नवरा जग्गू कोकणी नाशिकला रहात असून इक्बाल त्याच्या सतत संपर्कात असायचा. जग्गूवर खंडणीच्या अनेक गुन्ह्याची नोंद आहेत. या प्रकरणी त्याची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

दाऊदची पत्नी मेहजबीन दुबईत भेटली

दाऊदची पत्नी मेहजबीन भारतात आली नसली, तरी गेल्या वर्षी दुबईला जाऊन तिने आपल्या कुटुंबाची भेट घेतल्याचं इक्बालनं तपास यंत्रणांना सांगितलं आहे. त्याचवेळी मेहजबीननं आपल्याशी फोनवर बोलणं केल्याचंही इकबालनं मान्य केलं आहे.

भारताच्या दाव्यांना पाठबळ

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचं भारताकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. ज्याला पाकिस्ताननं नेहमी नाकारलं. मात्र आता दाऊदचा भाऊ इक्बालने दाऊद हा पाकिस्तानातच असल्याचं मान्य केलं आहे. गेल्या काही वर्षांत दाऊदने चार ठिकाणं बदलली असून जुलै २०१४ पासून तो सुरक्षित ठिकाणी असल्याचं इक्बालनं तपास यंत्रणांना सांगितलं आहे. माझं त्याच्याशी दोन वर्षांपूर्वी बोलणं झालं होत, मी अनिस इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं इक्बालने तपास यंत्रणांसमोर मान्य केलं आहे.

कोण आहे ती महिला?

'आयबी'ला मिळालेल्या माहितीनुसार दुबईत असलेली एक पाकिस्तानी महिला डी. कंपनीचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळते. ही महिला खंडणी म्हणून घेतलेले दागिने हवाल्याच्या स्वरूपात डी कंपनीला पोचवत असल्याचा 'आयबी'ने दावा केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही महिला काम करत असल्याचं देखील 'आयबी'ला समजलं आहे.


हेही वाचा -

इक्बालच्या पार्ट्यांनी दाऊदचा 'भेजा फ्राय'!

खंडणी प्रकरणात अनिस इब्राहिम देखील सामील - ठाणे पोलीस

खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या