शिक्षकांचे पगार यापुढे युनियन बँकेतूनच, उपसंचालकांनी दिले आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मागील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी लवकरात लवकर शिक्षकांचे पगार करण्याची घोषणा केली. त्यानुसार मुंबईच्या पश्चिम उत्तर व दक्षिण विभागातील शिक्षण निरीक्षकांना शिक्षकांची जुनी युनियन बँकेची खाती पूर्ववत करून पगार करण्याचे निर्देश मुंबई उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालयात रिट याचिका

राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाच्या सुमारे 27 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार युनियन बँकेतून मुंबै बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबई उपसंचालकांचे आदेश

युनियन बँकेत पगार देण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असताना, त्या धोरणात अचानक बदल करण्यामागचे ठोस कारणही राज्य सरकारने स्पष्ट केलेले नाही, असे नमूद करत मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश बेकायदा आणि शिक्षकांच्या हिताचा नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. या पार्श्वभूमीवर मुंबई उपसंचालकांनी हे आदेश दिले आहेत.


हेही वाचा

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ऑफलाइन होणार

पुढील बातमी
इतर बातम्या