सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन, ब्रह्मकुमारी परंपरेनुसार अंत्यसंस्कार

'बिग बॉस १३’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं सिद्धार्थचं निधन झालं होतं.

मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. यावेळी अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले होते, सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला आली होती.

अभिनेत्यावर अंत्यसंस्कार ब्रह्मकुमारी परंपरेनुसार (Sidharth Shukla Funeral Brahmakumari Rituals) करण्यात आलं. सिद्धार्थचा अध्यात्मावर विश्वास होता, याच कारणामुळे तो दीर्घकाळापासून ब्रह्मकुमारी संस्थानाशी जोडलेला होता.

याच विधींप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. कोरोना प्रोटोकॉलचं यावेळी पालन करण्याचा प्रयत्न होता.

सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मात्र त्यावरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल कूपर हॉस्पिटलनं मुंबई पोलिसांना सोपवला आहे. ओशिवरा पोलिस स्टेशनमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. सव्वा 4 तास चाललेल्या पोस्टमॉर्टमची व्हिडीओग्राफीही करण्यात आली.

हा अहवाल ५ डॉक्टरांच्या टीमनं तयार केला आहे. त्याचे शवविच्छेदन ३ तज्ञ डॉक्टरांनी केलं आहे. मुंबई पोलिस या प्रकरणात कोणताही चान्स घेणार नाही. सिद्धार्थचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाईल.

हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट आल्यानंतर हे स्पष्ट होईल की हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे की इतर काही कारणांमुळे. मुंबई पोलिसांकडून फक्त एवढेच सांगण्यात आलं आहे की, आम्ही कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत घाईघाईनं पोहोचू इच्छित नाही. आम्ही अद्याप रासायनिक आणि विश्लेषण अहवालाची वाट पाहत आहोत.


हेही वाचा

सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल मुंबई पोलिसांकडे सुपूर्द

राहुल महाजननं सांगितली सिद्धार्थच्या नातेवाईकांची अवस्था, शहनाज गिल तर...

पुढील बातमी
इतर बातम्या