बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या वक्तव्यावरून तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं तिच्याविरोधात महिला शिवसैनिकांनी आंदोलन केलं. राजकीय पक्षासोबतच सर्व सामन्य मुंबईकर देखील तिच्या वक्तव्यामुळे दुखावले गेले आहेत. पण आता या वादात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे.
अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 'एखाद्याच्या मताशी आपण सहमत नसूही, पण लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याच्या अधिकाराचं आपण रक्षण केलं पाहिजे. भाषणाचं स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, प्रेस-स्वातंत्र्य कोणी दडपू शकत नाही. एखाद्याच्या मताविषयी प्रतिवाद असू शकतो, पण टीका करणाऱ्याच्या पोस्टरला चप्पलेनं मारणं हे योग्य नाही,' असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
कंगनाविरोधात मुंबईसह महाराष्ट्रातून टीकेचा सूर आवळला जात असतानाच अमृता फडणवीस यांनी मात्र तिच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. त्यामुळे या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
कंगनानं सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर वक्तव्य केलं होतं. त्यावरून देखील संजय राऊत यांनी कंगनाला नाव न घेता सुनावलं होतं.
राऊत म्हणाले होते की, माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो.
याशिवाय, कंगनाकडे कुठले पुरावे असतील, तर तिने केवळ सोशल मीडियावर व्यक्त न होता पोलिसांना पुरावे द्यावेत. तसंच कंगनाला मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल, तर तिने मुंबईत परत येऊ नये, असंही राऊत यांनी सुचवलं होतं.
हेही वाचा