आयुष्मान-अमिताभ बच्चन यांची तू तू मैं मैं, 'गुलाबो सिताबो'चा ट्रेलर रिलीज

महानायक अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या बहुप्रतिक्षित 'गुलाबो सीताबो' या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला आहे. २ मिनिटं ४१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांच्यातली तू तू मैं मैं लक्ष वेधून घेते.

बिग बींनी हवेलीचे मालक मिर्झाची भूमिका साकारली आहे, तर आयुष्मान त्यांचा भाडेकरु असून त्याचं नाव बांके आहे. ट्रेलरमध्ये मिर्झा फातिमा महल नावाच्या हवेलीचे मालक असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर बांके त्यांचा भाडेकरु आहे.

बांकेला हवेली सोडायची नाही, तर मिर्झा यांना काहीही करुन बांकेकडून घर खाली करुन घ्यायचे आहे. याचेच मजेशीर चित्रण यात करण्यात आलं आहे. कथेत भावनिक बाजुही बघायला मिळतेय. मिर्झा यांना स्वतःचं मुल नसतं आणि बांकेचे वडील नाहीत. त्यामुळे या दोघांचे नाते कसे फुलत जाणार हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुषमाननं स्वत:च्या भूमिकेची ओळख करून दिली. ट्विटरवर ट्रेलर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, "मिर्झाला भेटा, जो त्याच्या वाड्याच्या प्रेमात आहे."

तर आयुषमाननं आपल्या व्यक्तिरेखेची ओळख करून देताना लिहिलं आहे की, "भेटा बांकेला. शहाणपणा याच्यापासूनच सुरु होतो."

शुजित सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सीताबो' हा चित्रपट लॉकडाऊनमुळे अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. येत्या १२ जून रोजी चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. २०० देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.


हेही वाचा

अनुष्का शर्मा अडचणीत, 'पाताल लोक' वेबसीरिज वादात

विद्या बालनचा चित्रपट 'शकुंतला देवी' अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज

पुढील बातमी
इतर बातम्या