मुंबईत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे!

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • पर्यावरण

येत्या ५ दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईसह, ठाणे, पालघर, कोकण पट्ट्यात हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. पुन्हा मे महिना सुरू झाला की काय, असं मुंबईकरांना वाटत होतं, पण अाता पावसाचं पुनरागमन होणार असल्याच्या बातमीनेच मुंबईकर सुखावले अाहेत.

मान्सून पुन्हा सक्रिय

बंगालच्या खाडीत पावसासाठी अनुकूल वातावरण असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. काही तासांपूर्वी पावसासाठी आवश्यक असणारं वातावरण निर्माण झाल्यानं २१ जूनपासून सलग ३ ते ४ दिवस मान्सून पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्याशिवाय पश्चिम किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेगही वाढत आहे. परिणामी मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

तुरळक ठिकाणी हजेरी

दिलासा म्हणून बुधवारी दादर, माहिम, गोरेगाव यांसारख्या अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला होता. मात्र, काही क्षणांतच पुन्हा तापमानात वाढ झाली.

पावसाचा जोर वाढणार

येत्या काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, मुंबईसह इतर भागात जवळपास ३० ते ४० मिमी. पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु वादळ किंवा अतिवृष्टी होण्याची कोणतीही शक्यता नाही.

- महेश पालावत, स्कायमेट


हेही वाचा-

ट्रेकिंग करताना 'ही' घ्या काळजी

याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?


पुढील बातमी
इतर बातम्या