नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन १४६ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १४६ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,८४७ झाली आहे. 

शुक्रवारी बेलापूर ४४, नेरुळ १९, वाशी १७, तुर्भे १०, कोपरखैरणे २१, घणसोली १३, ऐरोली २०,  दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर २०, नेरुळ १८, वाशी ४, तुर्भे १६, कोपरखैरणे १२, घणसोली ८, ऐरोली ९, दिघामध्ये ५ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५,२५८ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९७५ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १६१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दिवाळीपूर्वी शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला तीनशे ते चारशे असलेली रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली होती. मात्र, कोरोना रुग्ण संख्या दिवाळीनंतर पुन्हा वाढली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही घटून २६५ दिवसांवर आला आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३५२ दिवस होता. येथील मृत्युदर इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. मात्र रोज तीन ते चार मृत्यू होत आहेत. जुलै महिन्यात मृत्युदर ३.२६ होता. त्यानंतर तो कमी होत ऑक्टोबरमध्ये  २.०५ टक्के झाला. 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण संख्या हळूहळू कमी झाली. मात्र मृत्यूचे प्रमाण मात्र कायम होते. दिवसाला सरासरी तीन जणांचा मृत्यू होत होता. दिवाळीनंतर आजपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दिवाळीमध्ये अनेक नागरिक बाहेर पडले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली.  दिवसाला नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा ३ अंकांवर आली आहे. दरम्यान, पालिकेकडे उपलब्ध खाटांची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोरोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची सध्या गरज नाही, असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे.  ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.


हेही वाचा-

Mumbai Metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकार


पुढील बातमी
इतर बातम्या