...अखेर आराध्याला हृदय मिळाले

गेल्या दीड वर्षांपासून हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार वर्षांच्या आराध्याला अखेर हृदय मिळाले आहे. आराध्यावर मंगळवारी हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ती फोर्टीस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून तिला शुद्धीवर येण्यासाठी ४८ तास लागतील, असे आराध्याचे वडील योगश मुळे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

दीड वर्षापासून हृद्याच्या प्रतीक्षेत

दीड वर्षांपूर्वी तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्या वडिलांनी आराध्याला मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात नेले. तेथे तपासणीनंतर तिच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. पण एप्रिल २०१६ मध्ये आराध्याचा त्रास वाढल्याने तिला फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिचे हृदय निकामी झाल्याचे निदर्शनात आले. 

त्या चिमुकलीचे हृदय फक्त १० टक्केच काम करत होते. त्यामुळे तिच्यावर लवकरात लवकर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे तिथल्या डॉक्टरांनी सांगितले. पण गेले कित्येक दिवस झाले तरी तिला हृदय मिळत नव्हते. तिला वाचवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे 'सेव्ह आराध्या' ही मोहीम राबवण्यात आली. शाळेतल्या मुलांनीही तिच्यासाठी प्रार्थना केली होती.

असे मिळाले हृदय

तिला ब्रेनडेड झालेल्या २ ते ८ वर्षांच्या बालकाचे हृदय मिळण्याची गरज होती. आराध्याला वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फोर्टीस रुग्णालयात गेले कित्येक महिने तिच्यावर उपचार सुरू होते.

पण तिला काही केल्या हृदय मिळत नव्हते. अखेर डोनेट लाईफ या सामाजिक संस्थेच्या मदतीने सूरतच्या एका रुग्णालयात ब्रेनडेड झालेल्या १४ महिन्यांच्या बाळाचे हृदय तिला मिळाले आहे. या बाळाच्या कुटुंबीयांनी परवानगी दिल्याने आराध्याला हे हृदय मिळाले.

हे हृदय मंगळवारी सकाळी सूरतहून कमर्शिअल फ्लाईटने जुहूला आणण्यात आले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरने अवघ्या १८ मिनिटांत मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात आणले आणि तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला शुद्धीवर येण्यासाठी ४८ तास लागतील, अशी माहिती आराध्याच्या वडिलांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

माझ्या मुलीचा जीव वाचल्याने अत्यंत आनंद होत आहे. अवयवदान किती महत्त्वाचे हे आता समजतेय. आता मी आणि माझी पत्नीही अवयदानासाठी जनजागृती करणार. आम्हीही अवयवदानाचा अर्ज भरणार. जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करून अशा अनेक आराध्यांना वाचव्यासाठी पुढे यावे.

- योगश मुळे, आराध्याचे वडील


हेही वाचा - 

ह्रदय दानच देईल आराध्याला जीवनदान

छोट्या पेसमेकरची मोठी कामगिरी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या