छोट्या पेसमेकरची मोठी कामगिरी

 Mumbai
छोट्या पेसमेकरची मोठी कामगिरी

वस्तू जेवढी मोठी तेवढं तिचं कामही मोठं असं जुन्या जमान्यात म्हटलं जायचं. पण आताच्या नॅनो युगात वस्तू जेवढी छोटी तेवढं तिचं महत्त्वही मोठं मानलं जातं. याचं उत्तम उदाहरण सैफी रूग्णालयात नुकतंच पाहायला मिळालं. सैफीतील डॉक्टरांनी जगातील सर्वात छोट्या पेसमेकरचा वापर करून एका 78 वर्षीय रुग्णाला जीवनदान दिलं आहे. या रुग्णावर ट्रान्सकॅथेटर रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. हा पेसमेकर जगातील सर्वात छोटा पेसमेकर असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला असून अशी शस्त्रक्रीया करणारे सैफी हे मुंबईतील तिसरे रुग्णालय ठरलं आहे.

इराकवरुन आलेल्या एका 78 वर्षीय व्यक्तीला वारंवार चक्कर येत असल्याने त्याला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाचणीत कळलं की या व्यक्तीला कॉरोनरी आर्टरी ( ह्रदयाला रक्त पुरवठा करुन पोषण देण्याचे कार्य कॉरोनरी आर्टरी करते) आणि दीर्घकालीन ऑब्स्ट्क्टीव्ह पल्मनरी (फुप्फुसाची संबंधित गंभीर आजार) रोग असल्याचं समोर आलं. तसंच याआधी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचं समोर आलं. पण, त्या रुग्णाला वारंवार चक्कर, श्वासाचा त्रास होत असल्याने त्याच्या तपासण्या केल्यानंतर त्यांना ब्रॅडीकार्डिया हा आजार असल्याचं कळलं. त्यांच्या ह्रद्याचे ठोके अगदी कमी असल्याने त्यांना पेसमेकर बसवणे गरजेचे होते. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने त्यांना जगातील सर्वात छोटं पेसमेकर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पेसमेकरचा आकार मोठ्या व्हिटॅमीन कॅप्सूलएवढा असून तो लीडलेस आहे.

सामान्य माणसांच्या ह्रद्याचे ठोके मिनिटाला 60 पर्यंत कमी झाले तर रुग्णाच्या छातीत पारंपरिक पेसमेकर बसवले जाते. या पेसमेकरच्या वायर थेट ह्रद्यापर्यंत जातात. पण लीडलेस पेसमेकर अगदी चावीच्या भोकाच्या आकाराच्या छिद्रातून ह्रद्यात बसवले जाते. या शस्त्रक्रियेत रुग्णाला कमी त्रास होतो. लीडलेस पेसमेकर बसवून रुग्णाच्या ह्रद्याचे ठोके वाढवले जातात. या पेसमेकरची निवड करण्याचं कारण म्हणजे यात कार्डियाक वायरची गरज लागत नाही. त्वचेखाली पेसिंग थेरपी निर्माण करण्यासाठी सर्जिकल पॉकेट निर्माण करण्याची गरज नसते. ज्या रुग्णांना पेसमेकर किंवा लीडचा जंतूसंसर्ग होतो किंवा ज्यांच्यात ब्लॉकेजचे प्रमाण वाढते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
- डॉ. अली असगर बेहरानवाला, कार्डीओथेरेसीक सर्जरी विभाग प्रमुख, सैफी रुग्णालय

ब्रॅडीकार्डिया म्हणजे हृद्याच्या मंदावलेल्या ठोक्यांवर उपचार करण्यासाठी पेसमेकर वापरले जाते. पेसमेकरद्वारे हृदय सर्वसाधारण गतीला येते आणि यांत्रिक उत्तेजक मिळाल्याने हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते.

पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत या पेसमेकरचा आकार एक दशांश आहे. पारंपरिक पेसमेकरमध्ये लीडचा जंतूसंसर्ग, पेसमेकर पॉकेटचा संसर्ग इ. जोखिमा निम्म्याहून कमी झाल्या आहेत. ज्यांना दोनपेक्षा अधिक पेसमेकर लागतात, अशांसाठी छोट्या आकाराचा हा पेसमेकर तयार करण्यात आला आहे.
- डॉ. युनुस लोया, वरिष्ठ कार्डीओथेरेसीक सर्जरी सल्लागार, सैफी रुग्णालय

Loading Comments