मधुमेहींनी आंबा खावा की नाही?

  • मुंबई लाइव्ह टीम & मानसी बेंडके
  • आरोग्य

गोड खाऊ नको... शुगर वाढेल...असा सल्ला नेहमीच मधुमेहींना दिला जातो. त्यात आता आंब्याचा सीजन. उन्हाळा सुरू झाला की सर्वांना आंब्याचे वेध लागतात. पण मधुमेह म्हटला की खाण्या-पिण्यावर बंधनं येणं साहजिकच आहे. वर्षातून एकदा मिळणारा आंबा मधुमेहींनी चाखावा का? आंबा खाल्ल्यानं शुगर तर नाही वाढणार? असे अनेक प्रश्न मधुमेहींना पडतात. त्यांच्या याच प्रश्नांची आम्ही उत्तरं देणार आहोत!

मधुमेहींनी आंबा खावा?

आंबा हे फळ गोड असते. त्यामध्ये नैसर्गिक स्वरूपातच साखरेचे प्रमाण मुबलक असते. नैसर्गिक स्वरूपात साखर असणारी फळं मधुमेहींनी प्रमाणातच खावीत.

पण याचा अर्थ मधुमेहींनी आंबा खाऊच नये असा होत नाही. मधुमेही देखील आंब्याचा आहारात समावेश करू शकतात. मात्र त्याचे प्रमाण अधिक असू नये. मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षात घेता, कॅलरीजचं गणित सांभाळून आहारात आंब्याचा समावेश करता येऊ शकतो. तुम्ही सकाळी किंवा दुपारी एक आंबा खाल्लात तर चालू शकतं. कारण दिवसभर आपल्या शरीराची काहीना काही हालचाल सुरू असते. आंब्यामुळे तयार झालेली साखर दिवसभराच्या हालचालीमुळे शरीर वापरते. त्यामुळे एक आंबा सकाळी चालू शकतो.

नाहीतर तुम्ही आंब्याची अर्धी फोड दुपारच्या जेवणात आणि अर्धी फोड रात्रीच्या जेवणात समाविष्ट करू शकता. पण यासोबतच मधुमेहींनी संतुलित आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. कारण जर तुमचा आहार संतुलित नसेल आणि मधुमेह देखील आटोक्याबाहेर असेल, तर आंबा शरीरासाठी घातक आहे. मग अशा वेळी आंब्याचे सेवन न केलेलेच बरे!

आंब्याची पानं फायदेशीर

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आहे. त्यामुळे त्याचे सेवन करावे की नाही हे प्रत्येक मधुमेहिच्या संतुलित आहारावर पण अवलंबून आहे. पण अशा मधुमेहींना आंबा नाही तर आंब्याची पाने फायदेशीर ठरतील. आंब्याची कोवळी पाने रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी कुस्करून त्या पाण्याचे सेवन केल्यास मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.

जर मधुमेहींना पण आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर त्यांनी संतुलित आहार घ्या आणि शुगरवर नियंत्रण ठेवा. जर शुगरवर नियंत्रण असेल, तरच तुम्ही आंब्याची चव चाखू शकता आणि तेही प्रमाणात बरं का!


हेही वाचा

...म्हणून हा आहे 'फळांचा राजा'!

पुढील बातमी
इतर बातम्या