मुंबईकर हे नेहमीच घड्याळाच्या काट्यावर धावतात. या धावपळीचा जास्त परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक आजारांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार बहुतांश मुंबईकर डायबेटिस आणि हायपर टेन्शन यासारख्या आजारांमुळे त्रस्त आहेत.
गेल्या दोन वर्षांत डायबेटिस आजारानं त्रस्त असलेल्या ३ लाख मुंबईकरांनी आणि हायपर टेन्शन या आजारानं त्रस्त असलेल्या २.३ लाख मुंबईकरांनी पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. तर डायबेटिस आणि हायपर टेन्शन यासोबतच सामान्य तापानं त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. सामान्य तापाच्या रुग्णांची संख्या जवळपास १४.४ लाख असल्याचं देखील सर्वेतून समोर आलं आहे. तर सर्वेनुसार १.१५ लाख मुंबईकरांनी कुत्रा चावल्याच्या कारणास्तव रुग्णालयात उपचार घेतले. आश्चर्य म्हणजे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचं देखील सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
गेल्या दोन वर्षांत प्राथमिक पालिका रुग्णालयात ६७ लाख रुग्णांनी उपचार घेतले. ६७ लाख रुग्णांच्या तपासणीवरून हा सर्वे मांडण्यात आला आहे. काही रुग्णांमध्ये एकाहून अधिक आजार असल्याचं देखील समोर आलं आहे. उदाहरणार्थ कुणाला डायबेटिस आणि हायपर टेन्शन हे दोन्ही आजार आहेत. यासोबतच पालिकेच्या प्राथमिक रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. त्यामानानं दुय्यम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही कमी आहे. दुय्यम रुग्णालयांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण डायबेटिसनं तर १६ टक्के रुग्ण हायपर टेन्शन या आजाराने त्रस्त आहेत.
दुय्यम रुग्णालयांमध्ये आम्ही आणखी सोयी-सुविधा पुरवू. जेणेकरून या प्राथमिक रुग्णालयांवरील ताण कमी होईल. दीर्घकालीन किंवा गंभीर आजारांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा आजारांवर मोठ्या म्हणजेच प्राथमिक रुग्णालयांमध्ये उपचार करायला हवेत. तर तापासारख्या छोट्या आजारांवर दुय्यम दर्जाच्या रुग्णालयांमध्ये उपचार करता येऊ शकतात.
ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग
आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि हायपर टेन्शन यांसारख्या आजारांमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण असणं आवश्यक आहे. रोज नियमित व्यायाम आणि योग्य तो आहार या सवयींमुळे या आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचा
काळजी घ्या! तुमच्या उच्च रक्तदाबाचं हृदयविकारात रुपांतर होऊ शकतं!