Advertisement

...म्हणून हा आहे 'फळांचा राजा'!


...म्हणून हा आहे 'फळांचा राजा'!
SHARES

फळांचा राजा अशी ओळख असणारा, आंबट-गोड चवीनं आणि रसाळ गुणधर्मामुळे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय असणारा आंबा... हाच फळांचा राजा आणि वर्षातून एकाच ऋतूमध्ये उपलब्ध असणारा आंबा उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक प्रमाणात मिळतो. सर्वच या आंब्याची चव चाखण्यासाठी उत्सुक असतात.

आंबा हा एनाकाडअसी कुळातील आहे. आंबा हा हिरवट पिवळा, गुलाबी पिवळा आणि हिरवा अशा रंगांमध्ये मिळतो. तोतापुरी, हापूस, पायरी, उत्तर प्रदेशातील दशेरी, नीलम अशा अनेक वेगवेगळ्या जातीनुसार त्याचा आकार, रंग आणि चव बदलते. आपण एवढ्या आवडीनं खाणारा आंबा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या आहारात आणि औषधी अशा दोन्ही दृष्टीनं आंबा हा बहुमोल आहे.



आंब्याचे औषधी गुणधर्म

आंबा हा कापून खाण्यापेक्षा नेहमी चोखून खावा. कारण कापून खाल्लेला आंबा हा पचनास जड तर चोखून खाल्लेला आंबा हा पचनास हलका असतो. कैरी आणि आंबा या दोन्ही अवस्थांमध्ये यात औषधी गुणधर्म सापडतात. कैरी आम्लधर्मी स्तंभक आहे. कैरीचं साल हे उत्तेजक आहे.

तर आंबा हा मधुर, स्निग्ध, सुखदायक, बलदायक, पचायला जड, वायुहारक, थंड, शरीराची कांती वाढवणारा आहे. आंब्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, क जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, प्रथिने, मेद, पिष्टमय पदार्थ ही घटकद्रव्ये असतात.


आंब्याचे फायदे

  • आंब्यामध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रातांधळेपणावर आंबा औषधाप्रमाणे गुणकारी आहे.
  • उन्हाळ्यामध्ये बुबुळांची शुष्कता, डोळ्यांची आग होणे, खाज येणे यांसारखे नेत्रदोष आंब्याच्या सेवनाने टाळता येतात.
  • एखाद्या रुग्णाचे वजन कमी असेल किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, तर अशा रुग्णांनी रोज सकाळी, दुपारी आणि रात्री एक पिकलेला आंबा चोखून खावा आणि त्यावर एक ग्लास दूध प्यावे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून वजनही वाढते.
  • जुलाब होत असेल तर आंब्याच्या कोयीचे चूर्ण दीड ते दोन ग्रॅम मधाबरोबर किंवा पाण्यातून घ्यावे.
  • स्त्रियांना अतिरक्त स्त्राव, श्वेतस्त्राव हे विकार असतील, तर त्यांना कोयीचे चूर्ण फायदेशीर ठरेल.
  • आंब्याच्या सेवनानं आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे मलावस्तंभाचा त्रास होत नाही.
  • पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढवणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो.
  • आपल्या आहारात कच्च्या कैरीचे लोणचे, मुरांबा कायम वापरावा. पण लोणचे बनवताना त्यात तेल, मीठ आणि मसाला याचे प्रमाण योग्य असावे. तर मुरांबा बनवण्यासाठी साखरेएवजी गुळाचा वापर करावा.
  • बहुतांश आंब्याची सालं टाकून दिली जातात. पण आंब्याची सालं व्रणरोधक आणि गर्भाशयाची सूज घालवण्यासाठी फायदेशीर आहे.
  • आंब्याची कोय कृमीनाशक असून गर्भाशयाची सूज कमी करणारी आहे. यामुळे लघवीतील जंतूसंसर्गाचा त्रास कमी होतो.



हेही वाचा

दररोज एक केळे खा आणि शरीरस्वास्थ जपा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा