Advertisement

उन्हाळ्यातल्या विकारांपासून दूर राहाण्यासाठी 'सब्जा' घ्याच!

लिंबू सरबत, आईस्क्रीम, इतर थंड पेयं याचं उन्हाळ्यात अधिक सेवन केलं जातं. पण यासोबतच आणखी एक प्रकार उन्हाळ्यात खाणं आवश्यक आहे आणि तो म्हणजे सब्जा...

उन्हाळ्यातल्या विकारांपासून दूर राहाण्यासाठी 'सब्जा' घ्याच!
SHARES

अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारचं घराबाहेर पडूच नये असं वाटतं. उष्ण आणि दमट वातावरणात उष्णतेचे विकार बळावतात. विविध उष्णताजन्य तक्रारी या दिवसांमध्ये त्रस्त करतात. अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, मूत्रविसर्जन-मलविसर्जन करताना दाह वा वेदना होणे अशा त्रासांचा सामना करावा लागतो. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून आणि तक्रारी फार गंभीर नसतील तर तुम्ही घरच्याघरी उपचार करू शकता!



लिंबू सरबत, आईस्क्रीम, इतर थंड पेयं याचं उन्हाळ्यात अधिक सेवन केलं जातं. पण यासोबतच आणखी एक प्रकार उन्हाळ्यात खाणं आवश्यक आहे आणि तो म्हणजे सब्जा...सब्जा हे तुळशीच्या बीसारखे असते पण किंचित मोठ्या आकाराचे आणि काळसर-करड्या रंगाचे असते. सब्जा पाण्यात भिजवल्यावर तो फुगतो आणि पांढरट रंगाचा आणि बुळबुळीत होतो. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य विकारांवर अतिशय गुणकारी आहे.


सब्जा खाण्याचे फायदे

१) सब्जाची बी ही चवीला गोड असून शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याकरीता सब्जा उपयोगी आहे.

२) सब्जा बीमुळे मूत्र विसर्जन करताना होणारा दाह दूर होतो.

३) उन्हाळ्यात युरीन इन्फेक्शनचा त्रास अनेकांना होतो. सब्जाच्या सेवनानं युरिन इन्फेक्शनचा त्रास उद्भवत नाही.

४) चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी देखील सब्जा फायदेशीर आहे. सब्जामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स त्वचेचा पोत सुधारून त्वचा नितळ बनवण्यास मदत करतात.



५) सब्जामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यानं शरीराचे पचनकार्य सुरळीत होण्यास मदत होते.

६) सब्जाच्या सेवनानं शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकली जाऊन शरीर निरोगी बनते.

७) उष्णतेमुळे तोंड येणे, मुरुमे, पिंपल्स येणे, हातापायांची जळजळ हे विकार सब्जाच्या सेवनानं दूर होतात.

८) त्वचेचे विकार असणाऱ्यांनी सुक्या सब्जाच्या बिया बारीक वाटून त्यात खोबरेल तेल मिसळावे. हे मिश्रण अगदी थोडेसे गरम करून लावल्यास एक्झिमा सारख्या व्याधींमध्ये गुण येतो.

९) सब्जांच्या बियांमध्ये लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असल्यानं केसांसाठी सब्जा उत्तम आहे.



हेही वाचा : दररोज एक केळे खा आणि शरीरस्वास्थ्य जपा




कशातून खाऊ शकता सब्जा?

१) सकाळी रिकाम्यापोटी ग्लासभर लिंबूपाण्यात मध आणि चमचाभर सब्जा मिसळून प्या.

२) अनेक जण उन्हाळ्यात जेवणात दही खाणं पसंत करतात. अशावेळी दह्यांमध्ये सब्जा मिसळून खाऊ शकता.

३) सकाळच्या नाश्त्यामध्ये स्मुदी किंवा दूध घेत असाल, तर त्यात भिजवलेला सब्जा घाला.

४) ओट्स, मुसली अशा सकाळच्या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये सब्जा घालून खा.



५) संध्याकाळच्या कोऱ्या चहामध्ये (दुधाशिवाय), ग्रीन टीमध्ये सब्जा मिसळा.

६) तुमच्या पिण्याच्या पाण्यात थोडं मीठ, साखर आणि सब्जा घाला आणि त्याचं सेवन करा. त्यामुळे तहान कमी होण्यास मदत होते.

७) घरगुती सरबतं, फळांचा रस यामध्येही सब्जा मिसळून पिणे फायदेशीर आहे.



हेही वाचा

उभं राहून पाणी पिऊ नका! हे होतील दुष्परिणाम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा