नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणीला सुरुवात

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.  या अनुषंगाने जलद रुग्ण शोधण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दररोज ४ हजाराहून अधिक चाचण्या करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे त्यासाठी एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र आणि रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर बाहेर पडण्याच्या ठिकाणी महानगरपालिकेची आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. सकाळी ८ ते १ या वेळेत ही आरोग्य पथके नागरिकांची कोरोना चाचणी करणार आहेत. एका आरोग्य तपासणी पथकामध्ये ६ जणांचा समावेश आहे. सोमवारपासून बेलापूर, नेरुळ, आणि वाशी या तीन रेल्वे स्टेशनवर चाचणी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.

या पथकांव्दारे व्यक्तीची लक्षणे पाहून टेस्टींग करण्यात येत असून प्रामुख्याने आर.टी - पी.सी.आर. टेस्टवर भर देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ४०० हून अधिक नागरिकांचे ॲण्टिजन / आर.टी - पी.सी.आर. टेस्ट करण्यात आली आहे. उर्वरित रेल्वे स्टेशनवरही आरोग्य पथके कार्यान्वित करून चाचणी केली जाणार आहे.

एमआयडीसी क्षेत्रातही आसपासच्या परिसरातून हजारो कर्मचारी कामगार ये-जा करीत असल्याने तेथील कंपन्यांमध्येही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. रुग्ण शोधावर भर देण्यासाठी ज्या व्यक्तींचा लोकसंपर्क आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक व्यक्तीशी असतो अशा फेरीवाले, किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते, फळे व भाजी विक्रेते, रिक्षा चालक अशाप्रकाच्या जोखमीच्या कोव्हीड प्रसारकांची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याबाबतची कार्यवाही देखील तत्परतेने सुरु करण्यात आली आहे.


     

हेही वाचा -

यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी


पुढील बातमी
इतर बातम्या