ड्रॅगन, किवी फळात पौष्टिक घटक नाहीत?

डेंग्यू, मलेरिया झालेल्या रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा रुगणांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन आणि किवी ही फळे खायला देण्याचा आग्रह आपण धरत असतो. मात्र या फळांमध्ये पौष्टिक घटक आहेत किंवा नाही याची माहितीच महापालिका रुग्णालयातील आहारतज्ज्ञांना नाही.

रुग्णांना फळे देण्याची मागणी

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालय तसेच प्रसुतीगृहांमध्ये दाखल होणाऱ्या आंतररुग्णांना आरोग्यविषयक सेवेबरोबरच आहारही देण्यात येतो. महापालिका रुग्णालयांतील बहुतांश रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली पौष्टिक फळे विकत घेणं त्यांना परवडत नाही.

त्यामुळे महापालिकेच्या ३ प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळ व संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फळ, किवी तसंच पपई सारखी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळे देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक सुषम सावंत यांनी केली आहे.

उपचार करणं सोपं जाईल

सद्यस्थितीत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी झाल्यानंतर डॉक्टर त्यांना ड्रॅगन फळ, किवी तसंच पपईसारखा फलाहार करण्याचा सल्ला देतात. ही फळे महापालिकेने आपल्या रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांना दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढून त्यांच्यावर पुढील उपचार करणं सोपं जाईल, असं सुषम सावंत यांचं म्हणणं होतं.

आहारतज्ज्ञांचा अभिप्राय काय?

मात्र, या ठरावावर महापालिका वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी केईएम रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ यांच्या अभिप्रायनुसार रुग्णांना महाराष्ट्रात पिकणारी हंगामी तसंच बारामाही फळे देणं उचित असल्याचं म्हटलं आहे. 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन' च्या 'इंडियन फूड कंपोझिशन टेबल'मध्ये ड्रॅगन फ्रूट आणि किवी या फळांचा उल्लेख नसल्याने या फळांमधील पौष्टिक घटकांची माहिती उपलब्ध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पपई देखील नको

केईएम आणि नायर रुग्णालयातील आहारतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार पपई हे फळ कापून देताना रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याचा तसंच जीवनसत्वांचा ऱ्हास होण्याची शक्यता असते. त्यामुळे पपई हे फळ आंतररुग्णांना देणं योग्य ठरणार नसल्याचंही सुपे यांनी म्हटलं आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांकरीता दाखल करून घेण्यात आलेल्या रुग्णांना आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पौष्टिक पदार्थ, भाज्या आदींचा समावेश असलेलं जेवण पुरवण्यात येतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

जे. जे. रुग्णालयात महाअवयवदान रॅली; अवयवदानाबाबत जनजागृती

न धुतलेल्या कपड्यांमुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया रद्द


पुढील बातमी
इतर बातम्या