असे ओळखा अॅलोपथी डॉक्टर! आयएमएचा नवा लोगो

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्याचं आपण अनेक घटनांमधून ऐकलं असेल. म्हणजेच हल्ली अॅलोपथीचं अजिबात ज्ञान नसलेले डॉक्टर्सही स्वत:ला अॅलोपथी डॉक्टर म्हणवतात. अशा बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण, आता हे बोगस डॉक्टर रुग्णांना फसवू शकणार नाहीत. कारण, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ म्हणजेच (आयएमए) कडून अॅलोपथी डॉक्टरांसाठी एक नवा लोगो तयार करण्यात आला आहे. जो फक्त अॅलोपथी डॉक्टरांसाठीच असणार आहे.

लाल रंगात असणारे बेरजेचे चिन्ह हीच डॉक्टरांची ओळख बनली होती. पण, याचाच फायदा घेऊन काही बोगस डॉक्टरांनी आपापली दुकानं थाटली. अशा डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी पेटंट लोगोचा वापर केला जाणारा आहे. गेली दोन वर्ष आयएमएकडून अॅलोपथी डॉक्टरांसाठी वेगळा लोगो असावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हा लोगो तयार झाला असून त्याला भारताकडून पेटंट देखील मिळाले आहे.

अॅलोपथी, होमियोपथी आणि आयुर्वेद या तिन्ही विभागाचा अभ्यासक्रम वेगळा असतो.  भारतात 90 टक्के फक्त अॅलोपथीचेच डॉक्टर्स आहेत. याच गोष्टीचा बरेच बोगस डॉक्टर्स फायदा घेतात. आणि स्वत:चा धंदा करतात. अशा लोकांना आळा घालण्यासाठी हा लोगो मदत करेल. 

डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

लेटरहेड, क्लिनिकवर लागणार बोर्ड

देशातील सर्व एमबीबीएस आणि त्यावरील डॉक्टरांना त्यांच्या लेटरहेड आणि क्लिनिकबाहेरील बोर्डावर हा नवा लोगो लावण्यासाठी सांगण्यात येणार आहे. तसंच आयएमएकडून सर्व डॉक्टरांना याबाबत ई-मेलद्वारेही माहिती दिली जाणार असल्याचं आयएमए महाराष्ट्रचे खजिनदार शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितलं. होमियोपथी किंवा अन्य कुठल्याही डॉक्टरला हा लोगो वापरता येणार नाही. अन्यथा अशा डॉक्टरवर फौजदारी कारवाई केली जाईल असंही डॉ. लेले यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रात फार्मसी रेग्युलेशन कधी लागू होणार?

पुढील बातमी
इतर बातम्या