Plasma Therapy: नालासोपाऱ्यातील प्लाझ्मा बँक ठरली डोनर देणारी MMR मधील पहिली बँक

कोरोनाबाधित अतिगंभीर रुग्णावर उपचार प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून देणारी नालासोपारा येथील प्लाझ्मा बँक ही मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) पहिली प्लाझ्मा बँक बनली आहे. प्लाझ्मा डोनरच्या माध्यमातून बुधवार ८ जुलै २०२० रोजी अतिगंभीर स्वरूपाच्या रुग्णाला प्लाझ्मा दान करण्यात आला.

खासगी प्लाझ्मा बँकच्या प्रवेशामुळे ही उपचार पद्धती महागडी होण्याची अर्थात सर्वसामान्यांना सहजरित्या न परवडणारी ठरू शकते. याचं कारण म्हणजे नालासोपाऱ्यातील साथिया ट्रस्ट ब्लड बँकेने या करीता २० हजार रुपये निश्चित केले आहे. ही रक्कम सर्वसामान्यासाठी महागच म्हणावी लागेल. रक्तातील प्लाझ्मा वेगळे करण्याची प्रक्रिया देखील खर्चिकच आहे. मुंबई महानगरपालिके अंतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयात २०० मिली प्लाझ्माकरीता १५ हजार रुपये आकारण्यात येतात. तर जी व्यक्ती प्लाझ्मा दान करते त्या व्यक्तीला रुग्णालयाकडून एक प्रोत्साहनपर कार्ड मिळतं. त्या नुसार डोनरच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला डोनेशनच्या वर्षभरात प्लाझ्माची गरज भासली, तर २ हजार रुपयांची सवलत देण्यात येते.  

हेही वाचा - प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचं उद्घाटन, मुख्यमंत्र्यांनी केलं प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन

प्लाझ्मा थेरपीचा वापर सद्यस्थितीत कोरोनाबाधित अतिगंभीर रुग्णांवर करण्यात येत आहे. उपचारानंतर पूर्णपणे ठिक झालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या रक्तात कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या अँटीबाॅडीज तयार झालेल्या असतात. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून या अँटीबाॅडीज वेगळ्या काढून त्या कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्यात येतात. यासाठी प्लाझ्मा देणारी डोनर व्यक्ती कोरोनामुक्त होऊन २८ दिवसांपेक्षा (कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यापासून) जास्त कालावधी झालेला असावी. शिवाय त्या व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी १२.५ ग्रॅम/डीएल असावी.   

इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने काही मर्यादीत रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याची परवानगी दिली आहे. आयसीएमआरने एकूण २८ संस्थांना प्लाझ्मा थेरपी करण्यास परवानगी दिलेली आहे. यातील ६ संस्था या महाराष्ट्रातील आहेत. मुंबईतील महापालिकेच्या अखत्यारीतील कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यात येते.  

हेही वाचा - खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने महापालिका करणार रोज २५० अँटीजेन चाचण्या

पुढील बातमी
इतर बातम्या