मोनोरेल व्यवस्थापन आणि देखभालीसाठी दुसऱ्यांदा निविदा

वडाळा ते जेकब सर्कल मोनोरेल असा मोनोरेलचा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने कामाला वेग दिला आहे. पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्या टप्प्यासाठी एमएमआरडीएकडून केवळ तारीख पे तारीख दिली जात आहे. तर दुसरीकडे चेंबुर ते जेकब सर्कल असा संपूर्ण टप्पा कार्यान्वित करत मोनोरच्या देखभालीची जबाबदारी उचलण्यासाठी एमएमआरडीएला कंत्राटदारच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच चेंबुर ते जेकब सर्कल मोनोरच्या व्यवस्थापन (संचालन) आणि देखभालीसाठी एमएमआरडीएने आता दुसऱ्यांदा निविदा मागवल्या आहेत.

चेंबुर ते वडाळा हा मोनोचा दुसरा टप्पा तीन वर्षांपूर्वीच सेवेत दाखल झाला आहे. पण या मार्गाला मुंबईकरांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दररोज एमएमआरडीएचे लाखोंचे नुकसान होत आहे. पण चेंबुर ते जेकब सर्कल हा मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या वाढेल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग शक्य तितक्या लवकरच सेवेत आणण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा आहे.

दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असले, तरी मोनोच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आणि मोनो सुरू करण्यासाठी कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीकडून परवानगी अर्थात सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मोनो सेवेत दाखल करता येणार आहे. त्यासाठी आधी मोनो चालवण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी आणि मोनोच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती होणे गरजेचे आहे. मात्र ही नियुक्तीच रखडलेली दिसत आहे. जानेवारी 2017 मध्ये यासाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या. पण या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. उत्सुक कंपन्यांनी काही त्रुटी दूर करण्याची मागणी त्यावेळी केली होती.

डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा सेवेत

एकीकडे मोनोच्या व्यवस्थापन आणि देखभालीसाठी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मोनोच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या घेतल्या जात आहेत. 

या चाचण्या महिन्याभरात पूर्ण होतील. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण करत डिसेंबरपर्यंत चेंबुर ते जेकब सर्कल असा पूर्ण मोनो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

संजय खंदारे, अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीए


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या