Advertisement

मोनोसाठी आता १५वी डेडलाईन! ऑक्टोबरमध्ये तरी येणार का?


मोनोसाठी आता १५वी डेडलाईन! ऑक्टोबरमध्ये तरी येणार का?
SHARES

मुंबईतीलच नव्हे तर देशातील पहिली-वहिली मोनोरेल अशी ओळख असलेल्या चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्गातील वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. मे 2011 मध्ये हा टप्पा सेवेत दाखल होणे अपेक्षित असताना आता मे 2017 उजाडले तरी, या टप्प्याचे काम काही पूर्ण झालेले नाही. हा प्रकल्प राबवणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आतापर्यंत एक-दोन नव्हे तर, तब्बल 14 डेडलाईन चुकवल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पास विलंब झाल्याचे सांगत आता एमएमआरडीएकडून मोनोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 15 डेडलाईन देण्यात आली आहे. मोनोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याची सर्व प्रक्रिया पार पाडत ऑक्टोबर 2017 मध्ये हा टप्पा सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.

चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्गातील चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा नोव्हेंबर 2010 मध्ये तर, वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा मे 2011 मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र या संपूर्ण मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पहिला टप्पा सुरू होण्यास नोव्हेंबर 2010 एवजी फेब्रुवारी 2014 उजाडले. दुसरा टप्पा मे 2011 मध्ये सेवेत दाखल होणे अपेक्षित असताना आजही या टप्प्याची प्रतीक्षाच आहे. दरम्यान चेंबूर ते वडाळा टप्पा सुरू होऊन तीन वर्षे झाली असून तीन वर्षांपासून एमएमआरडीएला महिन्याला अंदाजे 70 लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कारण या पहिल्या टप्प्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोनोला प्रवासीच मिळत नसल्याने पहिला टप्पा फोल ठरला आहे.

चेंबूर ते जेकब सर्कल हा संपूर्ण मार्ग सेवेत दाखल झाल्यास मोनोचा तोटा भरून निघेल, या टप्प्याला प्रवाशांची साथ मिळेल असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हा टप्पा पूर्ण करण्याकडे एमएमआरडीएचा कल हवा होता. पण अजूनही या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याने पुढचे आणखी काही महिने एमएमआरडीएला लाखोंचा तोटा सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर खंदारे यांना मोनोच्या दुसऱ्या टप्प्याविषयी विचारले असता त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची महत्त्वाची प्रक्रिया पार पाडणे बाकी आहे. त्यानुसार जूनमध्ये या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि साधारण तीन-चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळाले की ऑक्टोबर 2017 मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एमएमआरडीएकडून 15 वी डेडलाईन आता देण्यात आली असून ही डेडलाईन तर एमएमआरडीएकडून पाळली जाते का की मोनोची प्रतीक्षा आणखी लांबते हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याच्या चुकवलेल्या डेडलाईन अशा


महिना
वर्ष
डिसेंबर
2010
मे
2011
डिसेंबर
2011
मे
2012
डिसेंबर
2012
डिसेंबर
2013
जून
2014
डिसेंबर
2014
मार्च
2015
डिसेंबर
2015
एप्रिल
2016
डिसेंबर
2016
फेब्रुवारी
2017
मे
2017


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा