डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम अखेर शापुरजी-पालोनजीकडे

डॉ. बाबासाहेबर आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक दादर, इंदू मिल येथील साडे बारा एकर जागेवर बांधण्यात येणार आहे. २ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला खरा, पण हा प्रकल्प अद्यापही विविध तांत्रिक अडचणीमुळे प्रत्यक्षात मार्गी लागलेला नाही. पण आता या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून बुधवारी या प्रकल्पाच्या बांधकामाची निविदा अंतिम करण्यात आल्या आहे. त्यानुसार शापुरजी-पालोनजी यांना बांधकामाचं कंत्राट देण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या कार्यकारी समितीनं नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंजुरी दिल्याची माहिती महानगर आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

म्हणून प्रकल्प रखडला

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी एमएमआरडीएने ४ महिन्यांपूर्वी निविदा मागवली होती. पण या निविदेला प्रतिसादच मिळाला नसल्यानं केवळ एकच निविदा सादर झाली. ही निविदा शापुरजी-पालोनजी समुहाची होती. नियमाप्रमाणे एकापेक्षा अधिक निविदा न झाल्याने ही निविदा रद्द करण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढावली. निविदा रद्द झाल्याने प्रकल्पही रखडला आणि एमएमआरडीएवर टीका होऊ लागली.

लवकर स्मारकाच्या कामाला सुरुवात

त्यामुळे एमएमआरडीएने २ नोव्हेंबर २०१७ रोजी पुन्हा निविदा मागवली. पण दुसऱ्यांदाही या निविदेला एकाच समुहाने अर्थात शापुरजी-पालोनजीनं प्रतिसाद दिला. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया रद्द करावी लागणार आणि प्रकल्प रखडणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं म्हणत समितीने आलेली निविदा अंतिम करत शापुरजी-पालोनजीला काम दिलं आहे. निविदा मार्गी लागल्याने आता प्रकल्पाचं कामही मार्गी लागेल, असं म्हणत एमएमआरडीएनं शक्य तितक्या लवकर स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा - 

डाॅ. आंबेडकर स्मारकाला महिन्याभरात सुरूवात- मुख्यमंत्री

पुढील बातमी
इतर बातम्या